
पंचवीस गुंठ्यात फुलविले फ्लॉवरचे पीक
आळेफाटा, ता. २५ : योग्य नियोजन, जैविक खते तसेच ठिबक सिंचनाच्या जोरावर बोरी खुर्दजवळील साळवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी कैलास भागाजी बांगर यांनी केवळ २५ गुंठ्यात फ्लॉवरचे भरघोस पीक फुलविले. फ्लॉवरच्या १५२२ या वाणाच्या १२ हजार रोपांची लागवड करून त्यांनी पहिल्याच तोड्यात सुमारे दोन टन मालाचे उत्पादन मिळवून नफा मिळविला आहे.
बांगर यांनी खतांची मात्रा व काळजी घेतल्यामुळे ५५ दिवसांमध्येच फ्लॉवर काढणीला आला. त्यांना आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च आला आहे. सध्या फ्लॉवरला प्रतिकिलो १५ ते १६ रुपये बाजारभाव मिळत आहे. खर्च वजा जाता त्यांना पहिल्याच तोड्यात पाच ते सहा हजार रुपये शिल्लक राहिलेली आहे व अजून पाच टन माल निघणार आहे. सध्या चालू असलेल्या बाजारभावानुसार ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळण्याची शक्यता बांगर यांनी ''सकाळ''शी बोलताना व्यक्त केली.
कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या बोरी खुर्द वडगाव कांदळी, भोरवाडी, जाधववाडी बोरी बुद्रुक या गावांमधील शेतकरी नदीच्या पाण्याच्या जोरावर कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेत नफा मिळवितात. बांगर यांनीही फ्लॉवरची लागवड करण्यापूर्वी कांदा पीक घेतले होते.
फ्लॉवरचे पीक फुलविण्यासाठी पत्नी लता तसेच कृषिमित्र बाबाजी बांगर यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे, असे कैलास बांगर यांनी सांगितले.
अशी केली लागवड
१. शेत रोटरून पंधरा दिवस तापत ठेवले
२. ठराविक अंतरावर ट्रॅक्टरने बेड तयार केले
३. बेडवर ठिबक सिंचन टाकले
४. नारायणगावमधून येथून १२ हजार रोपांची लागवड
५. लागवडीनंतर ठिबकद्वारे जैविक खताचा मात्रा दिली
६. आवश्यकतेनुसार औषधी फवारणी केल्याने पीक बहरले
योग्य जैविक खते तसेच काळजी घेतल्याने फ्लॉवरचे पीक चांगले बहरले आहे. त्याच्या उत्पादनातून अजून पाच टन माल मिळणार आहे. त्यास सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळेल.
- कैलास बांगर, फ्लॉवर उत्पादक
बोरी खुर्द (ता.जुन्नर) : फ्लॉवरचे पीक दाखविताना कैलास बांगर व त्यांच्या पत्नी लता.
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00887 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..