कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २२ : कांद्याला सध्या उत्पादन खर्चापेक्षा नीचांकी बाजारभाव मिळत आहे. खते, औषधे, मजुरी, मशागतीचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच नैसर्गिक आपत्ती, ओला दुष्काळ अशा अस्मानी संकटामुळे अधिकच मेटाकुटली आलेल्या जिल्ह्यातील उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहेत. भांडवली खर्चही निघत नसल्याने वर्षभराच्या खर्चाचा ताळमेळ कसा साधायचा असा यक्ष प्रश्‍न आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

प्रती एकर शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे एक लाख रुपये भांडवली खर्च करून कांदा उत्पादन घेतले जात आहे. कमी बाजारभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यात कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. भविष्यात बाजारभाव वाढतील या आशेवर गेल्या तीन महिन्यांपासून कांदा चाळीत ठेवला आहे. सततच्या पावसामुळे चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागला आहे. कांद्याला प्रतवारीनुसार प्रति किलो१२ ते १६ रुपये बाजार भाव मिळत असून, या बाजार भावाने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. सततचे बदलते हवामान, जमिनीत वाढलेली बुरशी यामुळे कांदा उत्पादन घेणे खर्चिक झाले आहे.

कर्जबाजारी होण्याची भीती
इंधनाच्या दरात वाढ झाल्याने मशागतीच्या खर्चाचा आलेख उंचावला आहे. मजुरांची टंचाई, वाढणारी मजुरी, त्यांचा वाहतूक खर्च यामुळे कांदा उत्पन्नातून काहीच हाती लागत नसल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांना पुरेसा नफा मिळत नसल्याने शेती करून कर्जबाजारी होण्यापेक्षा शेती न केलेली बरी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

कांद्याच्या निर्यातीस प्रोत्साहनाची गरज
भारतात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून परदेशातही भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परदेशात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याद्वारे शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव त्याचबरोबर देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळण्यास मदत होईल. कांद्याच्या निर्यातीस प्रोत्साहन देऊन परकीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला कशी मागणी वाढेल याकडे केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मत काही शेतकऱ्यांनी ''सकाळ''शी बोलताना दिले.

...तर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु मार्च २०२२च्या कर्जाच्या रकमेबरोबर बँकांनी सहा टक्के दराने व्याजाची आकारणी केली आहे. शेतकऱ्यांनी उसनवार पैसे गोळा करून ही रक्कम भरणा केली आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. पुढील सप्टेंबर महिन्यात मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील कर्ज रकमेचा भरणा करावयाचा असल्याने शासनाची जर व्याजाची रक्कम परत दिली नाही तर शेतकरी दुहेरी संकटात सापडणार आहे.

राज्यात सरकार बदलून उपयोग नाही तर सरकारचे धोरण बदलले पाहिजेत. कांद्यावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी हटविली तरच कांदा उत्पादकांना चांगला बाजारभाव मिळेल . शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीक कर्जाचा व्याजासह भरणा केला असून, शासनाने व्याजाचा परतावा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
- संजय भुजबळ, अध्यक्ष, तालुका शेतकरी संघटना जुन्नर

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01007 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..