आळेफाटा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
आळेफाटा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

आळेफाटा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३१ ः दिवाळीच्या सुट्या संपल्याने आळेफाटा (ता. जुन्नर) येथील बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणाहून आपापल्या गावी दिवाळीसाठी आलेले प्रवासी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे आळेफाटा बस स्टॅंड परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसच्या वाढीव फेऱ्यांमुळे बसस्थानकात गर्दी दिसत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असल्याने प्रवासी एसटीनेच प्रवास करायला प्राधान्य देत आहे. येथील बसस्थानक नियंत्रक खासगी वाहनांना हटकावून गर्दीत खिसेकापू, चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना वारंवार माईकवर घोषित करत होते. तसेच आळेफाटा चौकात ही वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याचे कार्य आळेफाटा पोलिस स्टेशन वाहतूक नियंत्रण विभाग, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व अतिरिक्त पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रवासी वाहनावर, टू व्हीलर चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पुणे - नाशिक महामार्ग बायपासचे काम चालु असून हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न या ठिकाणाहून जात असलेल्या प्रवाशांना तसेच ग्रामस्थांना पडला आहे. कारण आळेफाटा हे नगर- कल्याण व पुणे - नाशिक या दोन महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी मोठा चौक आहे. त्यातच गेल्या चार ते पाच दिवसांपासून आळेफाटा या ठिकाणी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यामुळे पुणे-नाशिक महामार्गाच्या आळेफाटा बाह्यवळण महामार्गाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत असून हा बाह्यवळण महामार्ग सुरु झाल्यानंतरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकणार आहे.