
आळेफाटा येथे १५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे
आळेफाटा, ता. १२ ः आळे गावचे उपसरपंच ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी १५ डिसेंबरपासून आळेफाटा (ता. जुन्नर) येथील चौकात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेला पिंपळगाव जोगा कालवा माजी आमदार वल्लभ बेनके आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांतून तयार झाला. तो कालवा व चाऱ्या, उपचाऱ्या यामुळे अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. परंतु, चाऱ्यांची अपूर्ण कामे, शेतकऱ्यांची संपादन झालेली जमीन, वाटपपत्र, बक्षीसपत्र, खरेदीखत, गहाणखत यासाठी अडचणी येत आहे. यासारखे विविध प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पाठपुरावा करून संपादित जमीन मोजणी, हिस्से, पोटहिस्से, यासाठी प्रयत्न केले. विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु, संपादित क्षेत्र निश्चिती व मोबदला मिळणे, अपूर्ण चाऱ्यांची कामे पूर्ण करणे, शेतकऱ्यांवर अनेक वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विद्यमान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी कुऱ्हाडे यांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवाय पाच दिवसांत शासकीय स्तरावरून दखल न घेतल्यास उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा कुऱ्हाडे यांनी दिला.