
वडगाव आनंद येथील ज्येष्ठ बिबट्याच्या हल्ल्यात जखमी
आळेफाटा, ता.२१ : वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे ६२ वर्षीय ज्येष्ठाला बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. २१) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मापदरा वस्तीवर राहात असलेले राजाराम बापू गागरे यांना आज पहाटेच्या सुमारास घराबाहेर कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला असता ते घरातून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी काठी उचलली असता बिबट्याने कुत्र्याला सोडून गागरे यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये ते गंभीर जखमी केले. पत्नीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. घटनास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. काकडे वनपरिक्षेत्र, वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक के.जी.भालेराव, बि. के. खर्गे यांनी भेट दिली आहे. जखमी झालेले गागरे यांना प्रथम आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औंध येथील उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस बिबट्याचे माणसांवर हल्ले वाढतच असून या परिसरात असलेल्या बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, आळे गावचे उपसरपंच ॲड. विजय कु-हाडे, वडगाव आनंद गावचे ग्रामपंचायत सदस्य डी. बी. वाळुंज यांनी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.