
ग्राहक पंचायतीकडून वीज दरवाढीला विरोध
आळेफाटा, ता. १३ ः महावितरण कंपनीने ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी सरासरी ३७% म्हणजे सरासरी दोन रुपये ५५पैसे प्रति युनिट याप्रमाणे प्रचंड भरमसाट दरवाढ मागणीचा प्रस्ताव विद्युत नियमक आयोगाकडे दाखल केला आहे. या दरवाढ मागणीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, रहिवासी, वीज ग्राहक यांनी विरोध करावा आणि हरकती नोंद कराव्यात, असे जाहीर आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी जिल्हा यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने या फेर आढावा याचिके संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियमक आयोग यांच्याकडे कायदेशीररीत्या योग्य असणारे सर्व बदल आणि दुरुस्त्या स्वीकारून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली. महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव हा चुकीचा व विद्युत कायदा तसेच ग्राहक विरोधी मागणी प्रस्ताव आहे.
प्रत्यक्षात कोणत्याही परिस्थितीत दहा टक्क्यांहून अधिक दरवाढ करता कामा नये. या विद्युत अपिलीय प्राधिकरण नवी दिल्ली या वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशांना हरताळ फासून ही अतिरेकी मागणी करण्यात आली आहे. इतक्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात ग्राहकांना तोंड द्यायलाच नको म्हणून आयोगाने जाणीवपूर्वक ही फायलिंग व ई हिअरिंग जाहीर केले आहे, अशी भावना ग्राहकांमध्ये दिसून येत आहे. इतकी दरवाढ सर्वसामान्य वीज ग्राहकांना वीज वापरणे परवडणार नाही, याचे दूरगामी परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकणार आहेत ही बाब राज्य सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे.
वीस किलो वॅटच्या वरील सर्व ग्राहकांना आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे पाच टक्के रिबेट मिळणे आवश्यक आहे. विविध सूचना, हरकती अभिप्राय अखिल भारतीय ग्राहकांच्या वतीने आयोगाकडे मांडल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी व प्रांत संघटक प्रसाद बुरांडे यांनी दिली.