रेडा समाधी मंदिरात हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडा समाधी मंदिरात हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला
रेडा समाधी मंदिरात हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला

रेडा समाधी मंदिरात हरिनाम सप्ताह, व्याख्यानमाला

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १५ ः आळे (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र रेडा समाधीच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळा, ज्ञानेश्वर माऊली मूर्तीच्या ६८व्या वर्धापनदिनानिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा १७ तारखेपासून सुरू होणार आहे. ‌यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडे, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच सायंकाळी राजाराम महाराज जाधव, सुदाम महाराज बनकर, उल्हास महाराज सूर्यवंशी, मुकुंदकाका जाठदेवळेकर, पोपट महाराज पाटील, बाळासाहेब महाराज देहूकर, महेश महाराज माकणीकर व पांडुरंग महाराज घुले या महाराजांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच यावर्षापासून देवस्थानच्या वतीने ज्ञानामृत व्याख्यानमाला दुपारी १ ते २ या वेळेत आयोजित केली आहे. यामध्ये डॉ. प्रि. नागेश गवळी यांचे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय, नीलेश जगताप यांचे छत्रपती शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य, प्रा. नीलेश पर्बत यांचे मी कोण होणार, रामदास घुंगटकर यांचे पसायदान, गिरीश डागा यांचे मेरे पास मॉं है व प्रा. उमेश बागडे यांचे सखा माझा ज्ञानेश्वर या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच दररोज कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी संतवाडी ते समाधी मंदिरापर्यंत भव्य अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर वेद बोलविलेल्या रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी होणार आहे. सकाळी दहा वाजता ज्ञानेश्वर (माऊली) कदम यांचे हरी कीर्तन होणार आहे, असे श्री क्षेत्र ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, उपाध्यक्ष नागेश कुऱ्हाडे, संजय शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, म्हतू सहाणे, बाजीराव निमसे व व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी केली आहे.