
बोरी खुर्द येथे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
आळेफाटा, ता. २२ : बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या गावात मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या येत असून दिवसा वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. गावात दिवसा तीन दिवस त्रिफेज वीज असते व इतर दिवशी रात्री मोटारीची वीज असते. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना शेतात पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीचे जावे लागते. परंतु बोरी गावात मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. बिबट्याने अनेक पाळीव प्राणी हल्ला करून ठार केले आहेत. या भीतीमुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीज पुरवठा करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार बेनके यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, वैभव काळे, संतोष काळे, निवृत्ती बेल्हेकर, तान्हाजी काळे, सुधीर बेल्हेकर, अनिल काळे, केशव काळे, सूरज काळे, कैलास काळे, सोमनाथ बेल्हेकर, चंद्रकांत काळे, मनसुख बांगर, नीलेश शेटे, रमेश चिंचवडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.