सध्याची पिढी सामाजिक बांधिलकीपासून दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सध्याची पिढी सामाजिक बांधिलकीपासून दूर
सध्याची पिढी सामाजिक बांधिलकीपासून दूर

सध्याची पिढी सामाजिक बांधिलकीपासून दूर

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३० ः सध्याची तरुण पिढी सोशल मीडिया आणि मोबाईल फोन यांच्या अतिरेकी वापरामुळे सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांपासून वेगाने दूर जात असून, विद्यार्थ्यांमध्ये संयमाचा अभाव, चिडचिड तसेच नैराश्य यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पालकांनी आपल्या मुलांना पुस्तके वाचनाची सवय कशी लागेल, याकडे लक्ष द्यावे,’ असे प्रतिपादन तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी राजुरी या ठिकाणी केले.


ग्रीनबुक चॅरिटेबल ट्रस्ट संस्था तसेच लुब्रिझॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तुर्भे नवी मुंबई या कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर फंड)च्या माध्यमातून राजुरी (ता. जुन्नर) येथील जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी सुमारे ५०० झाडे भेट दिली. त्याच्या वृक्षारोपणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सबनीस बोलत होते.

याप्रसंगी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष बबन हाडवळे, एकनाथ शिंदे, संजय गवळी, चंद्रकांत जाधव, गोविंद औटी, ज्ञानेश्वर गटकळ, शाकीर चौगुले, काशिनाथ औटी, शिवाजी हाडवळे, रंगनाथ औटी, सखाराम गाडेकर, धनाजीराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक नलावडे म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे, तसेच निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करावा.

याप्रसंगी आंबा, चिंच, नारळ, फणस, मोहगणी, कदंब, अर्जुन, बकुळ, पाम, चाफा, करंज अशा विविध जातींच्या सुमारे ५०० झाडांचे रोपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य जि. के. औटी यांनी केले, तर सूत्रसंचालन अशोक राहींज यांनी केले. आभार प्रिया हाडवळे यांनी मानले.
--------------------