
बोरी बुद्रूक येथे २ जूनला बोरी फेस्टीवलचे आयोजन
आळेफाटा, ता. २४ : प्रागैतिहासिक व अश्मयुगाचा वैभवशाली वारसा असलेल्या आणि इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात डोकावणाऱ्या बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे असलेल्या ऐतिहासिक पर्यटन, कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन व निसर्ग पर्यटन यांची ओळख व्हावी म्हणून पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था व बोरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने २ व ३ जून रोजी ‘बोरी फेस्टीवल’चे आयोजन केले आहे. त्यात ऐतिहासिक वस्तु संग्रहालय उभारणी व प्रदर्शन, सांस्कृतिक कला व लोककला प्रदर्शन, बोरीतील खाद्य संस्कृती व प्रदर्शन व विक्री, गावात तयार होणाऱ्या वस्तु, भाजी, फळे, कृषी उत्पन्न, बारा बलुतेदारांची उत्पादने यांची प्रदर्शने व विक्री, गावातील उद्योगधंद्यांची ओळख, बचत गटांची उत्पादने व विक्री होणार असून बोरी गावातील सांस्कृतिक, कला, क्रिडा, आरोग्य, विज्ञान, साहित्य, शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय, सहकार, कृषी, उद्योग आदी क्षेत्रात गावचे महत्त्व वाढून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या गुणी जणांचा बोरी भूमिपुत्र गौरविण्यात येणार आहे. तसेच, गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे.
बोरी महोत्सव भरविण्यात जुन्नर पर्यटन विकास संस्था, शिवनेरी ट्रेकर्स, स्वराज्य फाउंडेशन व शिवाजी ट्रेलसह जुन्नर पर्यटन चळवळीत कार्यरत सर्वांचा सहभाग असून, पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील पहिलाच पर्यटन महोत्सव आहे, अशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था बोरी बुद्रुक यांच्या वतीने देण्यात आली.