लग्नाळूंनो, ‘शुभमंगल’साठी सावधान!

लग्नाळूंनो, ‘शुभमंगल’साठी सावधान!

आळेफाटा, ता. ३१ : सध्या ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली भेटत नसल्याने अनेक मुले बिनलग्नाची राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मुलगा शेती करणारा असला, तर आणखीनच अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात अनेक कुटुंब प्रमुख आपल्या मुलाच्या लग्नासाठी मध्यस्थी व्यक्तीला मागेल ती रक्कम देऊन लग्न जमवून घेत आहे. त्यातच लग्न झाल्यावर नवरी मुलगी नांदेल, याची खात्री देता येत नाही. असाच एक प्रकार जुन्नर तालुक्यातील एका ३२ वर्षीय शेतकरी तरुणाची फसवणूक झाल्याची उघडकीस आली आहे. या तरुणाने या रॅकेटमध्ये सामील असलेल्या संबंधित एजंट व तरुणीसह एका महिलेबाबत आळेफाटा पोलिसांना लेखी तक्रार केली आहे.

जुन्नर तालुक्यातील एका गावातील एका शेतकरी तरुणाला शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. मुलगी मिळावी म्हणून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला, ‘पैसे दिल्यास मुलगी पाहून देतो,’ असे सांगितले. त्या व्यक्तीने नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने तरुणाला नाशिक जिल्ह्यातील एका गावात मुलगी दाखवली व ‘मुलीला वडील नसून, आई आजारी असल्याने आम्हाला मुलीचे लग्न करायचे आहे,’ असे सांगितले. यावेळी तरुणाला सांगण्यात आले की, ‘तू शेतकरी असल्याने तुला मुलगी मिळणार नाही. तू या मुलीशी लग्न करून टाक. त्यासाठी मुलीच्या आईला दोन लाख रुपये देऊ.’ तसेच, एजंटने आळंदी येथे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित तरुणाने एजंटला एक लाख रुपये दिले.
दरम्यान, १८ मे रोजी आळंदी येथील एका मंगलकार्यालयात थाटामाटात लग्न झाले. यावेळी मुलीला अडीच तोळे सोन्याचे दागिने घालण्यात आले व उर्वरित एक लाख संबंधित एजंटकडे देण्यात आले.
लग्नानंतर देवदर्शन, सत्यनारायण महापूजा व इतर धार्मिक विधी झाले. त्यानंतर मुलीला नाशिक येथे मावशीकडे सोडण्यात आले. त्यानंतर २५ तारखेला तरुणाने पत्नीला फोन करून, ‘कधी येते?’ असे विचारले असता मुलीने, ‘मला नांदायचे नाही,’ असे सांगितले. त्यानंतर तरुणाने एजंटला प्रत्यक्ष भेटून घडलेली हकिगत सांगितले. यावेळी एजंटने, संबंधित तरुणी व तिची साथीदार महिला माझा फोन उचलत नाही, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने अधिक चौकशी केली असता अशा प्रकारची फसवणूक जुन्नर तालुक्यात आणि संगमनेर व नगर येथेही झाल्याचे लक्षात आले. या ठिकाणी संपर्क साधला असता त्यांनी देखील आमची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे सांगितले.

व्हायरल व्हिडीओमुळे उघडकीस
जुन्नर तालुक्यातील तरुणाशी लग्न केल्यानंतर तरुणीने संगमनेर तालुक्यात २३ मे रोजी लग्न करत एका तरुणाची फसवणूक केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात पसरला. त्यामुळे संबंधित तरुणाच्या लक्षात आले की आपलीही फसवणूक करणारी टोळी हीच आहे. हे एजंट व बनावट लग्न करणाऱ्या तरुणी नगर व नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजले. या तरुणाने आपल्या फसवणुकीबाबत लेखी तक्रार व लग्नाचे पुरावे घेऊन २९ मे रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये येऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com