
साकोरीत कुकडी डाव्या कालव्याला भगदाड
बेल्हे, ता. ४ : साकोरी (ता. जुन्नर) परिसरात मंगळवारी (ता.३) मध्यरात्रीच्या कुकडी डावा कालवा फुटून भगदाड पडला. यामुळे बाजूच्या जमिनीत पाणी शिरल्याने सुमारे दोन ते अडीच हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. दरम्यान, जवळच्या पिरसाई ओढ्यातून हे पाणी कुकडी नदीला मिळाल्याने शेतीचे मोठे नुकसान टळले.
साकोरी येथे बेल्हे-साकोरी रस्त्यावरील कुकडी डाव्या कालव्यावरील पुलापासून पूर्वेकडे सुमारे ३०० मीटर अंतरावरील उत्तरेकडील बाजूने कुकडी कालवा फुटून त्याला भगदाड पडले. कालव्याला गेल्या दोन दिवसांपूर्वीच पाणी सोडले आहे. कालवा फुटण्याचे नेमके कारण समजले नसले तरी कालव्याच्या कडेच्या झाडांच्या मुळ्या दूरपर्यंत पसरल्याने, त्याठिकाणी पाणी झिरपून कालवा फुटला असावा, असा प्राथमिक अंदाज सुनील गाडगे, डॉ. दत्तात्रेय नेहेकर, दत्तात्रेय शिंदे, रवींद्र संभेराव आदी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कुकडी डावा कालवा फुटून भगदाड पडल्याने परिसरातील दिलीप उघडे, रामचंद्र उघडे या शेतकऱ्यांचे गहू, मका व ऊस पिकांचे जवळपास दोन ते अडीच हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. दरम्यान बेल्हे-साकोरी रस्त्याच्या कालव्यावरील पुलाजवळील डांबरी रस्त्यावरून हे पाणी जवळच्या पिरसाई ओढ्यातून कुकडी नदीला मिळाल्याने शेतीचे संभाव्य मोठे नुकसान टळले.
01678