
बेल्हे ते जेजुरी बससेवा सुरू करण्याची मागणी
बेल्हे, ता. २० : बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग क्रमांक ११७ हा रस्ता महाराष्ट्र शासनाने (HAMP) योजनेअंतर्गत जवळपास पूर्ण केला असून, भाविकांना कुलदैवत खंडोबा देवस्थानला दर्शनाला जाण्यासाठी बेल्हे ते जेजुरी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हा मार्ग क्रमांक ११७ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली व पुरंदर या पाच तालुक्यांतून जातो. महाराष्ट्रातील भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबा मंदिर जेजुरीपर्यंत हा रस्ता गेल्यामुळे, या मार्गावर नवीन एसटी बससेवा सुरू केल्यास या भागातील भाविकांची चांगली सोय होऊ शकणार आहे. बेल्हे ते जेजुरी हे अंतर जवळपास ११० किलोमीटर आहे. या रस्त्यावर लहान-मोठी अशी जवळपास २० गावे आहेत.
दरम्यान, बेल्हे-जेजुरी एसटी बस सकाळी ७ वाजता बेल्हे येथून सोडावी, तर जेजुरी येथून ती सायंकाळी ५ वाजता सोडण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन एसटी महामंडळ तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे तसेच संबंधित सर्व आमदारांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.