तरुणाची जिद्द : ५०० पाइप जमिनीत गाडून कामगिरी फत्ते पाच दिवसांत विहिरीत पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाची जिद्द : ५०० पाइप जमिनीत गाडून कामगिरी फत्ते
पाच दिवसांत विहिरीत पाणी
तरुणाची जिद्द : ५०० पाइप जमिनीत गाडून कामगिरी फत्ते पाच दिवसांत विहिरीत पाणी

तरुणाची जिद्द : ५०० पाइप जमिनीत गाडून कामगिरी फत्ते पाच दिवसांत विहिरीत पाणी

sakal_logo
By

पारगाव, ता. ७ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी गावातील अमोल अंकुश जाधव या तरुणाने जिद्दीने अवघ्या पाच दिवसांत ५०० पाइप जमिनीत गाडून तीन किलोमीटर अंतरावरील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेतातील विहिरीत आणून सोडले आहे. या पाण्यावर तो स्वत:ची पाच एकर तसेच खंडाने करायला घेतलेली १० एकर असे १५ एकर क्षेत्र ओलिताखाली आणणार आहे. त्याने पाणी साठवण्यासाठी एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याचे कामही सुरू केले आहे. त्याच्या या भगीरथ प्रयत्नांचे परिसरात कौतुक होत आहे.

धामणी परिसरातील काही शेतकरी स्वत:हून पुढे येत एकत्रितरित्या सिंचन योजना राबवू लागले आहेत. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनीही सहा महिन्यांपूर्वी पाच शेतकऱ्यांना बरोबर घेऊन योजना राबवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बोऱ्हाडे, शांताराम रोडे, सुहास गाढवे, गोपाळ रोडे, दीपक करंजखेले, बाबाजी बढेकर, सतीश करंजखेले, शांताराम जाधव, विश्वास करंजखेले, बाळू तांबे, सचिन बढेकर, दिलीप करंजखेले, संतोष करंजखेले हे शेतकरी एकत्र आले. त्यांनीही सिंचन योजना राबवली आहे. माळीमळा, हिवरकर मळा, टेकाडे मळा, गवंडी मळा, रोडेमळ्याचा काही भाग या परिसरासाठी एकत्रित सिंचन योजना राबविण्यासाठी या भागातील शेतकरी एकत्र येऊन त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्याचे उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे यांनी सांगितले.

अमोलने शेतात कालव्याचे पाणी आणून शेती बागायती करण्याचा निश्चय केला. तीन किलोमीटर अंतरावरील कालव्यातून तीन इंची पाइपमधून पाणी आणण्यासाठी २० फुटी ५०० पाइप लागणार होते. तातडीने कोणतीही बँक अथवा पतसंस्था मदत करणार नव्हती. अमोलची जिद्द पाहून बोऱ्हाडे, रोडे, गाढवे या मित्रांनी आर्थिक मदत केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

दोन जेसीबी मशिन, १७ ते १८ मजूर यांच्या मदतीने रात्रंदिवस काम करून अवघ्या पाच दिवसांत पाचशे पाइप जमिनीत गाडून कालव्यातील पाणी ७.५ अश्वशक्तीच्या मोटारीने शेतातील विहिरीत आणून सोडण्यात आले. यासाठी त्याला १२ लाख रुपये खर्च आला. कालव्यात पाणी सुरू असताना ते पाणी साठवून ठेवण्यासाठी १५० फूट लांब व १०० फूट रुंदीचे शेततळ्याचे काम त्याने सुरू केले. त्यामध्ये सुमारे एक कोटी लिटर पाणी साठवले जाणार असून, हे पाणी ठिबकद्वारे शेतीला दिले जाणार आहे.
- अमोल जाधव, शेतकरी

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00498 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top