
आंबेगावच्या द्राक्ष शेतीतील अभ्यासू बळिराजा
आंबेगावच्या द्राक्ष शेतीतील अभ्यासू बळिराजा
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील घनश्याम हरिदास निकम हे खडकाळ माळरानावरील १३ एकर क्षेत्रात गेली १८ वर्षापासून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. त्या माध्यमातून ते दरवर्षी ३५ ते ४० लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. त्यातून त्यांनी कुटुंबाच्या प्रगतीबरोबर परिसरातील १५ जणांना संपूर्ण वर्षभरासाठी; तर ६० ते ७० जणांना द्राक्ष हंगामासाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेती करण्याची आवड असणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांसाठी ते युवा आयडॉल ठरले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर या खेड्यातील ४० हून अधिक माणसांच्या एकत्र कुटुंब असलेल्या निकम परिवारात घनश्याम हरिदास निकम यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. ते मोठे बंधू व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त जयवंतराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खडकाळ माळरानावरील १३ एकर क्षेत्रांत गेल्या १८ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. त्यातून त्यांनी कुटुंबाची प्रगती साधून परिसरातील १५ जणांना संपूर्ण वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेती करण्याची आवड असणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांसाठी घनश्याम निकम हे युवा आयडॉल ठरले आहेत. द्राक्षबागांतील सखोल ज्ञानामुळे द्राक्षशेती क्षेत्रात त्यांची अभ्यासू तज्ज्ञ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
निकम परिवार हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धर्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या परिवाराची एकत्र कुटुंब पद्धत परिसरातील कुटुंबांसाठी आदर्शवत आहे. या कुटुंबाची युवापिढी उच्चशिक्षण घेत असली, तरी कुटुंबातील सर्वजण शेतीवर मनापासून प्रेम करतात. या कुटुंबाची राज्याला खऱ्या अर्थाने ओळख झाली, ते देवदत्त निकम यांच्यामुळे. त्यांनी कृषी शाखेतील पदवी संपादन केली. त्यानंतर ते समाजकार्यात लक्ष घालू लागले. देशात नावलौकिक मिळवलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे त्यांनी १० वर्ष अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. तसेच, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षम सभापती म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे सहाजिकच घरच्या शेतीची जबाबदारी ही घनश्याम निकम हे सांभाळत आहेत.
अनेकांना रोजगार
घनश्याम निकम यांनी कुटुंबाच्या मदतीने श्रीक्षेत्र थापलिंग गडाच्या पायथ्याला असलेल्या खडकाळ माळरानाचे सपाटीकरण केले. तेथे गेल्या १८ वर्षांपासून ते १३ एकर क्षेत्रात ‘रेड ग्लोब’ व ‘काळी जम्बो’ या जातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेत आहे. त्यांच्या शेतातील द्राक्षांची गुणवत्ता चांगली असल्याने त्यांची दरवर्षी उत्पादित होणारी द्राक्ष परदेशात निर्यात होतात. त्यामाध्यमातून त्यांना दरवर्षी सरासरी ३५ ते ४० लाख रुपयांचा निव्वळ उत्पन्न मिळत आहे. द्राक्ष शेतीच्या माध्यमातून परिसरातील गरजू १५ जणांना संपूर्ण वर्षभर रोजगार मिळाला आहे. तर, द्राक्ष तोडणी सुरु असताना परिसरातील ६० ते ७० जणांना महिनाभरासाठी रोजगार मिळतो.
यशस्वी द्राक्ष बागायतदार
घनश्याम निकम हे द्राक्ष बागात बारकाईने लक्ष देऊन कोणती फवारणी कधी केली पाहिजे, छाटणी कधी करायचे, पाणी किती वेळ सोडायचे, पाण्यातून कोणती खते द्यायची, याची वेळेवर काळजी घेतात. देवदत्त निकम हेही दररोज सकाळी द्राक्ष बागेत फेरफटका मारून घनश्याम निकम यांना फवारणीबद्दल मार्गदर्शन करत असतात. द्राक्षबागेत सोयाबीन, कारले, दुधी भोपळा व झेंडू फुलांसह विविध प्रकारचे आंतर पीक घेण्याचाही प्रयोग करून त्यातूनही ते चांगले उत्पन्न मिळवतात. घनश्याम निकम यांना द्राक्ष शेतीसाठी त्यांची पत्नी गायत्री, भाचा प्रशांत निघुट व त्याची पत्नी ज्योती यांच्यासह संपूर्ण निकम कुटुंब वेळोवेळी मदत करतात. त्यामुळेच ते यशस्वीपणे शेती करत आहे. घनश्याम निकम यांची उत्तर पुणे जिल्ह्यात यशस्वी द्राक्ष बागायतदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00539 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..