
अवसरी बुद्रुक येथे जनरेटरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत
पारगाव, ता. ६ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणने वीज पुरवठा बंद केल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिल्यानंतर ग्रामपंचायतीने भाडेतत्वावर जनरेटर लावून पाणी पुरवठा सुरळीत केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
अवसरी बुद्रुक गावाला तीन किलोमीटर अंतरावरून घोड नदी येथून, सात पिंपळाची विहीर, कुंभार बारव व हिंगे मळा येथील उजव्या कालव्याच्या शेजारी असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होत आहे. घोड नदीवरील पाणीपुरवठा वीज मोटारीचे सुमारे बारा लाख रुपये वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला आहे, तर इतर तीन विहिरींना पाणी नसल्यामुळे गावठाण परिसराला मागील महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, मागील दोन आठवड्यापासून नळाला फक्त दहा ते पंधरा मिनिटे पाणी येत असल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली होती. तत्काळ सरपंच पवन हिले यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक घेऊन जनरेटर लावून पाणी देण्याचा निर्णय घेतला, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, स्वप्नील हिंगे, उद्योजक महेंद्र शिंदे यांनी घोड नदीवरील विहिरीची पाहणी केली. त्याठिकाणी मोटारीची केबल व दरवाजा चोरीला गेल्याचे आढळल्याने वायरमन यांच्या मदतीने सर्व साहित्य आणून पाणीपुरवठा मोटर जनरेटरच्या साह्याने चालू करून गावाला पाणीपुरवठा सुरळीत केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00563 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..