
धामणीत ३२ हजार वृक्षलागवडीचा उपक्रम
पारगाव, ता. २४ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले यांनी केले.
धामणी (ता. आंबेगाव) वन विभागाच्या वतीने ५० एकर क्षेत्रात ३२ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी करंजखिले बोलत होते. वृक्ष लागवडीचा प्रारंभ करंजखिले व वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी वनपाल सोनम भालेराव, वनरक्षक साईमाला गीते, वन कर्मचारी, सरपंच सागर जाधव, दत्ता गवंडी, अंकुश भूमकर, युवराज बढेकर, केरभाऊ बढेकर, अक्षय विधाटे, महेश कदम, भाऊ करंजखिले आदी उपस्थित होते.
लोणी धामणी हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. सध्या येथे थोडाफार पाऊस सुरू झाला असल्यामुळे या परिसरात वन विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे. धामणी येथील वीस हेक्टर क्षेत्रामध्ये ३२ हजार झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने २० हजार सागाची झाडे लावण्यात येणार आहेत. उर्वरित १२००० झाडांमध्ये बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, शिसव, अर्जुन, कांचन आदी देशी झाडे लावण्यात येणार असल्याचे राजहंस यांनी सांगितले. या संपूर्ण नवीन झाडांसाठी वन विभागामार्फत पाण्यासाठी पाइपलाइन करण्यात आली असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00602 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..