
लोणी येथील रस्त्यासाठी रहिवाशांचे आज उपोषण
पारगाव, ता. ११ : लोणी (ता. आंबेगाव) येथील गलठावस्तीमधील रहिवाशांना वस्तीवर जाण्या-येण्यासाठी गेली अनेक वर्षे झाली रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या वस्तीसाठी रस्ता करावा या मागणीकरिता येथील सर्व रहिवासी मंगळवार (ता. १२) रोजी लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी ११पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड यांनी दिली.
बेल्हा-जेजुरी राज्य महामार्गालगत गलठावस्ती असून रस्त्यापासून वस्तीपर्यंत साधारण एक किलोमीटर लांबीचा रस्ता आवश्यक आहे. काही अंतरापर्यंत ग्रामपंचायतीने रस्त्याचे काम केले आहे. पुढे काही घरांची व शेतीची मोठी अडचण आहे. त्यामुळे रहिवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. वस्तीवरील नागरिकांना इतरांच्या शेतातून किंवा घराच्या अंगणातून कसेबसे जावे लागते. वस्तीवरील शेतकऱ्यांना व रहिवाशांना शेतीमाल, दूध व जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. वस्तीवरील महिलांनी व रहिवाशांनी रस्ता मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने मंगळवारी रस्त्याबाबत न्याय मिळेपर्यंत, सर्व ग्रामस्थ एकजुटीने रस्त्याच्या मूलभूत प्रश्नासाठी लोणी ग्रामपंचायत या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00618 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..