खडकवाडीच्या डॉल्फिन टेकडीवर बहरली देशी रोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवाडीच्या डॉल्फिन टेकडीवर बहरली देशी रोपे
खडकवाडीच्या डॉल्फिन टेकडीवर बहरली देशी रोपे

खडकवाडीच्या डॉल्फिन टेकडीवर बहरली देशी रोपे

sakal_logo
By

पारगाव, ता. २३ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील डॉल्फिन टेकडीवर गावातील तरुणांनी देशी प्रजातीच्या सुमारे सात हजार रोपांची लागवड केली असून डॉल्फिन टेकडी हिरवीगार झाली आहे. टेकडीवर मोर व इतर वन्यप्राणी आनंदाने बागडू लागले आहेत. टेकडीवरच २८ लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले असून त्यातील पाणी ठिबकद्‍वारे झाडांना दिले जात आहे. तालुक्याच्या पूर्व भागात डॉल्फिन टेकडी एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ म्हणून नव्याने उदयास आले आहे.
सुमारे अडीच वर्षापूर्वी गावातील वृक्षप्रेमी आदेश भागवत यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त या टेकडीवर १२५ वडाच्या रोपांचे रोपण केले. त्यानंतर पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीचे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन झाडकरी ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमातून या टेकडीवर व्यापक स्वरूपात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. या टेकडीचा आकार डॉल्फिन माशा सारखा असल्याने तरुणांनी या टेकडीचे नामकरण डॉल्फिन टेकडी केले. परिसरातील तरुण कोणाचा वाढदिवस असला किंवा विवाह असो, सण उत्सव असो या आनंदाच्या क्षणी या टेकडीवर वृक्षारोपण करतात. या मोहिमेसाठी परिसरातील स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे व वनविभाग यांनी सहकार्य केले. आत्तापर्यंत टेकडीवर सात हजारपेक्षा जास्त देशी प्रजातीची झाडे श्रमदानातून लावली गेली, त्यांचे संगोपन केले. निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांच्या माध्यमातून सुमारे एक हजार वृक्षांची पूर्तता झाली तसेच मोरडे फूड्स कंपनीच्या माध्यमातून टेकडीवर २८ लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले. वन विभागाच्या वनरक्षक साईमाला गित्ते यांच्या सहकार्यातून झाडांची तहान भागवण्यासाठी मध्यवर्ती मुख्य पाइपलाइन व दोन माती बांध तळ्यांचे काम करण्यात आले. मोरांची व इतर वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता टेकडीवर एक पाणवठा तयार करण्यात आला आहे.
उन्हाळ्यामध्ये वेळोवेळी श्रमदान घेऊन टेकडीवरील सर्व झाडे झाडकरी ग्रुपने व ग्रामस्थांनी जगवली. रामदास वळसे पाटील यांनी टेकडीला भेट देऊन वृक्षांचे संगोपन पाहून भविष्यात वृक्षांच्या संगोपनासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अशोक जाधव, उद्योजक संदीप पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव पोखरकर, शुभम सुक्रे, प्रवीण रणदिवे, आशिष सुक्रे, मयूर सुक्रे, प्रमोद धुमाळ, सुनील सुक्रे आदि उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00767 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..