दिलीप वळसे पाटील : सुसंस्कृत राजकारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप वळसे पाटील : सुसंस्कृत राजकारणी
दिलीप वळसे पाटील : सुसंस्कृत राजकारणी

दिलीप वळसे पाटील : सुसंस्कृत राजकारणी

sakal_logo
By

दिलीप वळसे पाटील : सुसंस्कृत राजकारणी

सध्या संवेदनशील बनत चाललेल्या राजकीय परिस्थितीत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून पाहिले जात आहे. राजकीय पटलावर त्यांच्यावरही टीका होते. होत नाही, असे मुळीच नाही. पण, त्या टीकेला एक तात्त्विक अधिष्ठान असते. असभ्य, असंस्कृत, वैचारिक दिवाळखोरी, असे मापदंड लाभलेली टीका त्यांच्यावर झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. याला कारण, त्यांचे सुसंस्कृत असणे आहे.

-श्री. एन. आर. टाव्हरे, निरगुडसर

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५६ रोजी निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शेतकरी कुटुंबात झाला. बी.ए.एल.एल.बी., एल.एल.एम.पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर थोड्याच दिवसात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यास सुरुवात केली. स्वकर्तृत्वाने शरद पवारसाहेबांचा विश्वास संपादन केला आणि सन १९९० मध्ये आंबेगाव मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत ते अखंडपणे आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
दिलीप वळसे पाटील हे गेल्या ४० वर्षांपासून राजकीय जीवनात आहेत. व्यक्तिगत जीवन कमी आणि सार्वजनिक अर्थात लोकाभिमुख जीवन जास्त असे त्यांचे जीवन राहिले आहे. या ४० वर्षांच्या कारकिर्दीत अजातशत्रू अशी त्यांची ओळख बनून राहिली आहे. राजकारणात हेवेदावे, विरोधक, वैर, पराकोटीचे मतभेद, पातळी सोडून केली जाणारी टीकाटिप्पणी या गोष्टी नित्त्याच्याच झाल्यात, असे वाटले; तर काही गैर नसावे.
वळसे पाटील राज्याच्या राजकारणात उच्च व तंत्रशिक्षण खात्यापासून ते अगदी गृह खात्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचा कारभार पाहिला आहे. या प्रत्येक खात्याला व त्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ऊर्जामंत्री असताना त्यांच्यावर टीकाही झाली. पण, अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत त्यांनी हे राज्य उर्जासमस्येच्या संकटातून बाहेर काढले. अर्थमंत्रिपदावर असताना अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यासाठी त्यांनी सुमारे ३१ हजार कोटींची कर्जमाफी केली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची स्थापना असो, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रात विणणे असो, कोरोना काळात उत्पादन शुल्क विभागामार्फत राज्याची अर्थव्यवस्था सांभाळणे असो, कामगार स्थिरावले जावेत म्हणून त्यांना सानुग्रह अनुदान देणे असो, पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे तसेच वन स्टेप प्रमोशन असो की विधानसभा अध्यक्षपदावरून कायदेशीररीत्या कामकाज चालवून विधानसभेत एक आदरयुक्त शिस्त निर्माण करणे असो.
श्री. वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या दूरदर्शी कामांची जंत्री ही न संपणारी आहे. पण, या प्रत्येक विभागात काम करत असताना अभ्यासूवृत्ती, वक्तशीरपणा, शिस्त, संयम, टीकेला कामातून उत्तर देणे, आदी गोष्टी दिलीपरावांनी खूप जपल्या आहेत. म्हणूनच आज महाराष्ट्रातून त्यांच्याविषयी आदरभाव दाखवला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या कामात राम शोधणाऱ्या व्यक्तीने दिलीप वळसे पाटील यांच्या कार्याची दखल घ्यावी तर गृह खात्याच्या कारभार चालवत असताना एकदा हॉटेल ताजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे वळसे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करावे आणि शरद पवार यांनी अगदी विश्वासाने कोणतीही जबाबदारी द्यावी आणि वळसे पाटील यांनी अगदी दखलपात्र काम करावे. खरे म्हणजे यातच त्यांचे मोठेपण आले.
सध्या संवेदनशील बनत चाललेल्या राजकीय परिस्थितीत वळसे पाटील यांच्याकडे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून पाहिले जात आहे. राजकीय पटलावर त्यांच्यावरही टीका होते. होत नाही, असे मुळीच नाही. पण, त्या टीकेला एक तात्त्विक अधिष्ठान असते. असभ्य, असंस्कृत, वैचारिक दिवाळखोरी, असे मापदंड लाभलेली टीका त्यांच्यावर झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. याला कारण, त्यांचे सुसंस्कृत असणे आहे. निष्ठा, तत्त्वांशी प्रामाणिक राहणे, वैचारिक उंची ठेवणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे, कामसूपणा, अभ्यासूवृत्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभ्यता आणि सुसंस्कृतपणा, या गोष्टी साहेबांना खूप जपल्या. आज महाराष्ट्रातील राजकारण आणि काही राजकीय नेत्यांची भाषा ऐकली, तर मन सुन्न होते. आपल्या महाराष्ट्राची नक्की ओळख कोणती? असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत दिलीप वळसे पाटील यांचे सुसंस्कृत असणे हे उठून दिसते. आणि खरंच, महाराष्ट्राला अशा सुसंस्कृत राजकारणी
लोकांची नितांत आवश्यकता आहे.
साहेब, आपल्याला ६६व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या निरामय जीवनासाठी ईश्वराकडे प्रार्थना आणि आपल्या हातून अजूनही अधिकाधिक उज्ज्वल स्वरूपाचे कार्य व्हावे, अशी मनोकामना.

००४५७