उद्याच भविष्य अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्याच भविष्य अंधारात
उद्याच भविष्य अंधारात

उद्याच भविष्य अंधारात

sakal_logo
By

पारगाव, ता. १ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक वीजमीटर असल्याने भरमसाट वीजबिल येत आहे. वीजबिल भरण्यासाठी शासकीय तरतुदी नसल्याने बिले थकल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही शाळांच्या वीजकनेक्शन तोडण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे शाळेतील संगणक, इ-लर्निंग, शुध्द पाणी प्रकल्प आदी सर्व यंत्रणा बंद पडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
शासन एकीकडे डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देत असताना दुसरीकडे मात्र व्यावसायिक दराने वीजबिलांची आकारणी केली जात असल्याने वीजबिले थकल्याने वीज कनेक्शन तोडली जात असल्याने डिजिटल शिक्षणाला खीळ बसत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक वीजमीटर असल्याने भरमसाट वीजबिले येत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शाळात पालक, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून संगणक प्रयोगशाळा, ई-लर्निंग सुविधा, टीव्ही, पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा यंत्रणा आदी विजेवर चालणाऱ्या सुविधांमुळे वीजबिले भरमसाट येत आहे. आलेली ही भरमसाट बिले मुख्याध्यापक अनेकदा शासकीय अनुदानात किंवा लोकवर्गणीतून भरत असतात. परंतु, काही वेळेस ही वीजबिले थकल्याने त्यांचा आकडा फुगून तो २० ते २५ हजाराच्या घरात जातो. एवढ्या मोठ्या रकमेची वीजबिले भरणे शक्य होत नसल्याने महावितरण वीजबिले थकलेल्या शाळांचे वीजजोड तोडत आहे. अशाच प्रकारे धामणी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे २० हजार ८०० रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने तीन दिवसापूर्वी शाळेची वीज तोडली आहे. त्यामुळे शाळेतील संगणक, इ-लर्निंग, शुध्द पाणी प्रकल्प आदी सर्व यंत्रणा बंद पडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.

जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने वीज बिलांची आकारणी केली जाते. त्यामुळे भरमसाट बिले येतात. त्यामुळे शासनाने शाळांना घरगुती दराने वीज बिलांची आकारणी करावी तसेच शासनाने विशेष बाब म्हणून शाळांची विजेची गरज भागवण्यासाठी सोलर यंत्रणा बसविल्यास वीज बिलांबाबत प्रश्न उपस्थित होणार नाही.
-भाऊसाहेब कदम, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, धामणी

शाळांच्या थकीत वीजबिलाबाबत अनेकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना कळवले आहे. त्यांनी त्यावेळी सांगितले की, ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळांच्या वीज बिलाबाबत तरतूद करता येते. त्यानुसार अशा थकीत वीज बिले असणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील शाळांची यादी जिल्हा परिषदेला पाठवण्यात आली आहे. त्याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे पाठपुरावा केला.
सविता माळी, गटशिक्षणाधिकारी, आंबेगाव तालुका