अवसरी येथे कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याला यांत्रिकीकरणाची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरी येथे कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याला यांत्रिकीकरणाची जोड
अवसरी येथे कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याला यांत्रिकीकरणाची जोड

अवसरी येथे कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याला यांत्रिकीकरणाची जोड

sakal_logo
By

पारगाव, ता. १२ : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यातील कुंभार कारागिरांनी पारंपारिक पद्धतीने संक्रांतीसाठी मातीची सुगडी बनविण्याच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. पाच कुटुंबांनी विजेवर चालणाऱ्या यंत्रावर सुगडी बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या सर्व कुटुंबातून सुमारे अडीच लाखाहून जास्त सुगडी तयार होणार असून सुगडी बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.
संक्रांतीचा सण एका महिन्यावर आला आहे. येथील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या संक्रांतीच्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातून मागणी असते. गेल्या एक महिन्यापासून सुगडी बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. पारंपारिक लाकूड व सिंमेटपासुन बनविलेल्या चाकावर सुगडी बनवताना चाक फिरवताना जास्त कष्ट पडत होते. यामध्ये हात दुखायचे, कामही कमी व्हायचे, त्यामुळे येथील कुंभार कारागिरांनी विजेवर चालणाऱ्या मोटारीवरील चाकावर सुगडी बनविण्यास सुरवात केली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. या एका यंत्राला २५ ते ३० हजार रुपयांना खर्च येतो. पूर्वी चाकावर एक कारागीर दिवसाला ६०० ते ७०० सुगडी बनवायचा, आता तो यंत्राच्या साह्याने दिवसाला एक हजारहून जास्त सुगडी बनवत आहे. त्यामुळे या पिढीजात पारंपारिक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देत पुणे जिल्ह्यात सुगड्यांना ठोक स्वरूपात ग्राहक शोधण्याचे काम केले आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. खेड, जुन्नर, शिरूर, मावळ बरोबर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून सुगड्यांच्या मागणीची आगाऊ नोंदणी झाल्याची माहिती कारागीर शंकर चव्हाण यांनी दिली.
संपूर्ण कुंभार वाड्यातून या संक्रातीला अडीच लाख सुगडी तयार होतील. मातीचे दर वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेने सुगड्यांच्या दरात वाढ झाली आहे. अडीच हजार रुपये प्रती हजार, याप्रमाणे ठोक विक्रेत्यांना सुगडी दिली जात आहे. ते मागील वर्षी दोन हजार रुपये प्रती हजार दराने विकली होती.