
जारकरवाडीत वाघ यांचा गाडा ‘घाटाचा राजा’
पारगाव, ता. १ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) गावचे ग्रामदैवत श्री वडजाईदेवी मातेच्या यात्रा महोत्सवाला मंगळवारपासून (ता. २८) मोठ्या उत्साहात सुरवात झाली. यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत एकूण १२५ बैलगाडे पळाले. घाटाचा राजा किताब किसन रघुनाथ वाघ (पहाडदरा) यांच्या गाड्याने पटकाविला. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण रोख एक लाख १५ हजार रुपये व पाच चषक बक्षीस देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वार्थाने प्रगतशील गावं म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावचे ग्रामदैवत श्री वडजाईदेवी मातेचा यात्रा महोत्सवाला मंगळवारपासून सुरवात झाली. सकाळी देवीची महापूजा, अभिषेक, आरती, हारतुरे, मांडव डहाळे हे धार्मिक विधी झाले. त्यानंतर दिवसभर बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या. रात्री देवीचा पालखी सोहळा व त्यानंतर विठ्ठल कृपा कला नाट्य मंडळ जारकरवाडी यांचा भारूडाचा कार्यक्रम झाला.
बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकात सुवर्णयुग बैलगाडा संघटना (अवसरी), द्वितीय क्रमांकात देविदास अरुण मेहेर (शिंगवे), तृतीय क्रमांकात बाळासाहेब दगडू बांगर (खडकी), तर चौथ्या क्रमांकात सुरेश नाथा गाजरे यांचे बैलगाडे पहिले आले. फायनलमध्ये बाळासाहेब दगडू बांगर (खडकी) यांचा बैलगाडा प्रथम आला, तर किसन रघुनाथ वाघ (पहाडदरा) यांचा बैलगाडा द्वितीय आला.
AMG23B02139