''लक्ष्या''मुळे बढेकर बंधूंच्या घरात अवतरली लक्ष्मी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''लक्ष्या''मुळे बढेकर बंधूंच्या घरात अवतरली लक्ष्मी
''लक्ष्या''मुळे बढेकर बंधूंच्या घरात अवतरली लक्ष्मी

''लक्ष्या''मुळे बढेकर बंधूंच्या घरात अवतरली लक्ष्मी

sakal_logo
By

पारगाव, ता. ७ : अनेक बैलगाडा शर्यतींमध्ये “घाटाचा राजा किताब मिळवणाऱ्या ''लक्ष्या'' नावाच्या खिल्लार जातीच्या बैलाची तब्बल ३० लाख ११ हजार १११ रुपयाला विक्री झाली आहे. जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील माऊलीकृपा बैलगाडा संघटनेच्या पोपट सोनबा बढेकर व सुरेश सोनबा बढेकर या भावांच्या घरात या बैलामुळे खऱ्या अर्थाने लक्ष्मी अवतरली.

गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील कैलास भगवंता गावडे या हौशी बैलगाडा मालकाने ३० लाख ११ हजार १११ रुपये विक्रमी किमत देऊन लक्ष्याची खरेदी केली आहे. या विक्रमी किमतीची तालुक्यात जोरात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बैलगाडा शर्यतीची आवड असणाऱ्या बढेकर बंधूंनी आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय शर्यतीमुळे त्यांनी एक वर्षापूर्वी बैलाच्या व्यापाऱ्याकडून त्यांनी ४८ हजाराला एक बैल खरेदी केला. त्याचे ''लक्ष्या'' असे नाव ठेवले. त्याने जिल्ह्यातील अनेक घाटांमध्ये विजेतेपद मिळवून बक्षीसे व नावलौकीक मिळवून दिला. लक्ष्याने लागोपाठ चार बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा किताब मिळवला आहे. नांदूर (ता. आंबेगाव) येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत सेमी फायनलमध्ये लक्ष्याने घाटाचा राजा किताब मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर अनेक बैलगाडा मालकांनी बढेकर भावांकडे बैलाची मागणी केली. हौसेला मोल नसते असे म्हणतात या म्हणीचा अनुभव ''लक्ष्या'' बैलाची कैलास गावडे यांनी खरेदी केली.

दरम्यान, लक्ष्याला गावडे कुटुंबाकडे देण्यापूर्वी संपूर्ण बढेकरमळ्याने लक्ष्याची दत्त मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली त्याला निरोप देताना बढेकर कुटुंबाचे डोळे पाणावले होते.

पोपट बढेकर व सुरेश बढेकर या भावांनाही शर्यतीची खूप आवड आहे. परंतु बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बैलाला चांगली किमत आल्याने त्यांनी लक्ष्याची विक्री केली. या मिळालेल्या पैशातून ते कुटुंबावर असलेली काही देणी मिटवून चांगले घर बांधणार आहे. नवीन घराला ''लक्ष्या''चे नाव देणार आहे.
- श्‍याम बढेकर, अध्यक्ष, माऊलीकृपा बैलगाडा संघटना

शर्यतींमुळे बैलांच्या किमतीत नवा उच्चांक
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रा- जत्रा उत्सव सुरू झाल्याने बैलगाडा शर्यतीस प्रारंभ झाला आहे. घाटात बैलगाडे धावू लागले आहेत, त्यामुळे बैलगाडामालक शौकीन सुखावले आहेत. शर्यतीच्या निगडित अनेक व्यवसायाला चांगले दिवस आले आहे. त्यामुळे बैलांच्याही किमती रोज नव नवा उच्चांक गाठत आहे.

02170