
वडगावपीर आखाड्यात नामवंत मल्लांच्या कुस्त्या
पारगाव, ता. १८ : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे श्री पीरसाहेब देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला. विजेत्या मल्लांना ५१ रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीसे देण्यात आली.
पुणे, मावळ, मुळशी, खेड, शिरूर, भोसरी येथील नामवंत मल्लांनी हा आखाडा गाजविला. कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक मल्लांनी निकाली कुस्त्या केल्याने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. उपस्थितांकडून विजेत्या मल्लांना वैयक्तिक बक्षीसे देण्यात आली.
या कुस्तीच्या आखाड्यात पायल शेळके व प्रेरणा शेळके (जारकरवाडी) व शिरूर केसरी सिद्धी होळकर व श्रेया होळकर (जातेगाव) या सख्या बहिणीच्या कुस्त्यानी प्रेक्षकांची मने जिंकली. पंच म्हणून पहिलवान गोरक्ष सासवडे, विजय आदक, पोपट आदक, रवी ढगे पाटील यांनी काम पाहिले. तर, आखाड्याची व्यवस्था माजी सरपंच संजय पोखरकर, रमेश आदक, विश्वनाथ साबळे, रामदास पालेकर, माजी उपसरपंच रवींद्र गुळवे, अण्णा पोखरकर, दिलीप पोखरकर, पांडुरंग पोखरकर यांनी केली.