
बिबट्याच्या हल्ल्यात अवसरीत वासरू ठार
पारगाव, ता. २१ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील रमेश अनंता चव्हाण यांच्या पाच वर्षाचे वासरू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाले.
अवसरी येथील चव्हाणमळा परिसरात राहणाऱ्या रमेश आनंदा चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतात चरण्यासाठी त्यांनी वासरू बांधले होते. काही काळानंतर वासरू त्यांना तिथे आढळून आले नाही. त्यांना वाटले वासरू आजूबाजूला चरायला गेले असेल. त्यानंतर नवनाथ चव्हाण यांच्या शेतामध्ये वासराचा मृतदेह आढळला. तेथे जवळच असणाऱ्या कांद्याच्या शेतातून बिबट्याने वासरू फरपटत ओढत नेऊन नवनाथ चव्हाण यांच्या शेतात वासराचा फडशा पाडलेला आढळून आला आहे.
अवसरी बुद्रुक आणि परिसरात मागील चार ते पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची व बिबट्यांच्या बछड्यांची संख्या वाढलेली आहे. डोंगराच्या बाजूच्या भागात नागरिक सायंकाळी बिबट्याच्या भीतीने अंधार पडल्यानंतर घराच्या बाहेरसुद्धा येण्यास धजावत नाही. अवसरी बुद्रुक येथील चव्हाण मळ्यात पिंजरा बसविण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण यांनी केली आहे.