वाळुंजनगरला मिळणार महसुली गावाचा दर्जा

वाळुंजनगरला मिळणार महसुली गावाचा दर्जा

पारगाव, ता. १९ : वाळुंजनगर (ता. आंबेगाव) गावाला १५ दिवसांत स्वतंत्र महसुली गाव करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
वाळुंजनगर हे गाव कागदपत्री स्वतंत्र महसूल गाव झाले नसतानाही सन १९९२ मध्ये चुकीच्या पद्धतीने वाळुंजनगर ग्रामपंचायत निवडणुक घोषित करण्यात आली. त्यामुळे गावाला सेन्सेस कोड उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतंत्र गावासाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ गावाला मिळत नव्हता. गाव नकाशा व ७/१२ तयार होत नाही. मूळ लोणी गावामधून वाळुंजनगर हे गाव वेगळे झाले आहे, परंतु वाळुंजनगर गावाचे लोणी ग्रामपंचायतमध्ये विभाजनाचे कागदपत्रे आढळत नाहीत. वाळुंजनगर येथील विविध शासकीय माहिती ऑनलाइन भरता येत नाही. गावामध्ये जन्म-मृत्यू नोंदणीची ऑनलाइन माहिती भरता येत नाही. अशा अनेक तांत्रिक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळावा म्हणुन वाळुंजनगर ग्रामविकास समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासुन शासन दरबारी प्रयत्न सुरु होते, असे समितीचे अध्यक्ष अशोक वाळुंज यांनी सांगितले.
जोपर्यंत स्वतंत्र गावाचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक थांबवावी, असा ग्रामसभेत एक मताने ठराव मंजूर झाला होता. या संदर्भात आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी वाळुंजनगर ग्रामस्थ व महसूल विभागाची बैठक सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी आढळराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कंरजखेले, अशोक वाळुंज, महेंद्र वाळुंज, सरपंच विजय सिनलकर, सुमित वाळुंज, राजु वाळुंज, बाबाराजे वाळुंज आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी देशमुख यांनी, पंधरा दिवसांमध्ये वाळुंजनगर गाव महसुली करण्यासाठी व सेन्सेक्स नंबर मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्व कागदपत्र नकाशे हे आंबेगाव तहसीलदारांनी दहा दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावे व पंधरा दिवसांनी परत गॅझेट प्रसिद्ध करून वाळुंजनगर गावाला महसुली गावाचा दर्जा देऊ, असे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com