
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पारगावात वनविभागातर्फे पिंजरा
पारगाव, ता. २ : पारगाव (ता .आंबेगाव) येथील कौठमळ्यात शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले .त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. याची दखल घेऊन वनविभागाने रविवारी (ता. ३०) पिंजरा लावला आहे.
राजाराम कोंडिबा थोरात (वय ६०) या माजी सैनिकावर बिबट्याने उसातून येऊन हल्ला केला होता. यामध्ये थोरात यांनी जोरदार प्रतिकार करत स्वतःचा जीव वाचविला. थोरात यांच्या हाता पायांना जखमा झाल्या. त्यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. येथील शेतात पिंजरा लावण्यासाठी रविवारी (ता. ३०) वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गिते यांना सूचना दिल्या. त्यानुसार कौठमळ्यात पिंजरा लावण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सुनील थोरात, राजेश ढोबळे, विजय पडघमकर, जयवंत रोडे, राहुल ढोबळे, प्रसाद ढोबळे, निखिल चक्कर आदी उपस्थित होते.
02466