
काठापुरात पोलिस असल्याचे सांगून लुटले
पारगाव, ता. ९ : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सुदाम विठोबा करंडे (वय ६५) या शेतकऱ्याला पोलिस असल्याचा बनाव करत दोघांनी गुंगीचे ओषध नाकासमोर धरून भूल टाकून दिवसाढवळ्या लुटले. यात करंडे यांच्याजवळील सोन्याच्या दोन अंगठ्या व रोख रक्कम, असा मिळून ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.
काठापूर बुद्रुक येथील शेतकरी सुदाम करंडे हे ६ मे रोजी सकाळी साडेअकरा सुमारास सुमारास कांद्याच्या पिशव्या शिवण्याचा धागा घेऊन दुचाकीवरून कांद्याच्या वखारीकडे जात होते. काठापूर गावाच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावर आमंत्रण ढाब्याजवळ समोरून दोघेजण मोटारसायकलवर आले. त्यांनी करंडे यांना थांबवले. त्यांच्यातील एकाच्या डोक्यात हेल्मेट; तर दुसऱ्याच्या तोंडाला मास्क होते. त्यातील एकाने, ‘आम्ही पोलिस आहोत, पारगाव येथे दरोडा पडला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत,’ असे म्हणत एक फोटो करंडे यांना दाखवला व तुम्ही याला ओळखता का? असे विचारत फोटो दाखवून नाकापाशी धरला. फोटो नाकापाशी धरल्यामुळे करंडे यांना तपकिरीसारखा उग्र वास आला व चक्कर आल्यासारखे झाले. त्यावेळी त्यांनी करंडे यांना तुमच्या हातातील अंगठ्या, मोबाईल जवळचे पैसे काढून एका रूमालामध्ये ठेवा, असे म्हणाले. करंडे यांनी त्यांच्या डाव्या हातातील ४५ हजार रुपयांच्या दोन्ही अंगठ्या, मोबाईल, जवळचे पंधरा हजार रुपये रुमालात ठेवले. त्यांनी रुमालाची गाठ बांधून रुमाल करंडे यांच्याकडे दिला व तिथून निघून गेले. करंडे यांनी पाच मिनिटांनंतर रुमाल उघडून पाहिला असता त्यात साडेचारशे रुपयांचा मोबाईल होता.
याबाबत आपली फसवणूक झाल्याची त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर करंडे यांना चक्कर आल्यासारखे झाले व ते शेतातील झाडाखाली झोपले. दोन दिवस त्यांना व्यवस्थित वाटत नसल्यामुळे व चक्कर येत असल्यामुळे त्यांनी बरे वाटल्यानंतर सोमवार (ता. ८) पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.
याबाबत पुढील तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पारगाव पोलिस करत आहेत.
पोलिसांकडून आवाहन
पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही पोलिस असल्याचे बतावणी करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडे जवळील मौल्यवान वस्तू पैसे देऊ नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या गावात आजूबाजूला संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.