
पारगावात ज्येष्ठाला हातचलाखीने लुटले
पारगाव, ता. २० : पारगाव (ता. आंबेगाव) व निरगुडसर गावाच्या हद्दीवर दिवसाढवळ्या खंडू भाऊ टाव्हरे (वय ८२) या ज्येष्ठ नागरिकाला पोलिस असल्याची बतावणी करत बोटातील अंगठी हातचलाखी करत चोरट्यांनी पळवून नेली.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांना चोरट्यांनी टार्गेट केले असून, पारगाव-निरगुडसर गावाच्या हद्दीवर बेटवस्ती येथे खंडू टाव्हरे यांची पत्रा कंपनी आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास निरगुडसर-पारगाव रस्त्यावरील त्यांच्या पत्रा कंपनीच्या समोर अनोळखी व्यक्तीने पोलिस असल्याची बतावणी करून स्वतःचे पोलिस असल्याचे आयकार्ड दाखवत, ‘तुमच्या परिसरातील लोकांचे दागिने चोरीला गेले आहेत, मी साध्या वेशात फिरत आहे. तुमच्या हातातील अंगठी, मोबाईल, घड्याळ व जवळचे पैसे काढून रुमालामध्ये ठेवा,’ असे सांगून त्याने रस्त्यावर उभे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीस बोलावून त्याच्या खिशातील रुमाल काढून टाव्हरे यांची अंगठी व मोबाईल हे त्याच्या मोटारसायकलवर ठेवली व त्याची गाठ मारून त्यांना परत दिला. त्यावेळी गाठ मारलेला रुमाल अनोळखी व्यक्तीने स्वतः जवळ घेतला एक दोन मिनिटे बोलून परत टाव्हरे यांच्याकडे दिला. त्यातील एक जण म्हणाला, ‘तुम्ही आमच्या बरोबर पोलिस ठाण्याला या.’ त्यानंतर दोघेही मोटारसायकलवर निघून गेले.
टाव्हरे हे स्वतःच्या मोटरसायकलवरून त्या अनोळखी व्यक्तींच्या मागे पोलिस ठाण्याला निघाले असता रस्ता खराब असल्याने चोरटे जोरात निघून गेले. टाव्हरे हे पोलिस ठाण्याला आल्यानंतर त्यांना इतरत्र पाहिले असता ते दिसले नाही. त्यामुळे चोरट्याने हातचलाखी करत रुमालातील अंगठी पळून नेली, याची खात्री झाल्यावर त्यांनी पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.