
बसस्थानकातील समस्या अद्याप कायम
आपटाळे, ता ३० : जुन्नर बसस्थानकातून बहुतांशी जुन्नरचा पश्चिम आदिवासी भाग, नारायणगाव, घोडेगाव, पुणे व मुंबई या भागापर्यंत एसटी बसची सेवा पुरवली जाते. जुन्नर एसटी बस स्थानक पुन्हा एकदा प्रवाशांनी गजबजलेले असले तरी बसस्थानकातील समस्या मात्र अद्यापही सुटल्या नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर येत आहे. येथे कचरा टाकला जात असल्याने स्थानक परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जुन्नर बसस्थानाकाच्या मुख्य दर्शनी भागातच खड्डे पडले असून त्यात असलेल्या खडीमुळे अनेकदा प्रवाशांना सोडवायला आलेले दुचाकीस्वार दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच तेथे असणाऱ्या चेंबरवर झाकण नसल्याने एक महिला प्रवासी गाडी पकडण्याच्या घाईत या चेंबरमध्ये पडल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली.
बसस्थानकात नव्याने सुलभ शौचालय बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली असली तरी या शौचालयाच्या परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण अधिक आहे. बसस्थानाकाच्या पश्चिमेच्या बाजूस मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने हे बसस्थानक आहे की कचराकुंडी असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. यामुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर घाणीचे व दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे.
सांडपाण्यामुळे बसस्थानकात दुर्गंधी
बसस्थानकाजवळ असलेल्या बोडकेनगर परिसरातील सांडपाणी हे बसस्थानाकाच्या आवारात येत असल्याने दुर्गंधी वाढत आहे तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर या परिसरातील पाणी येत असल्याने त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार याबाबत नियंत्रक विभागाकडे तक्रार करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असलेल्या वेटिंग शेडमध्ये बसविण्यात आलेले पंखे ऐन उन्हाळ्यातच बंद असल्याने या पंख्याचा बसवून फायदा काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध केल्यास खासगी वाहनाने प्रवासी प्रवास करणार नाहीत.
- अनिता उगले, प्रवासी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर जुन्नर बसस्थानकातील बस सेवा पूर्वपदावर येत आहे. आजमितीस जवळपास ८० टक्के एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असून लवकरच पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरळीत होईल. सध्या दररोज या बसस्थानकातून एसटीच्या १२७ फेऱ्या होत आहेत.
- मणियार, वाहतूक नियंत्रक
01344
Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00879 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..