प्लॅस्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लॅस्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात
प्लॅस्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात

प्लॅस्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

आपटाळे, ता. १० ः जुन्नर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंचलिंग मंदिर देवस्थानच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक शेतकरी मनीष बुट्टे पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन बुट्टे पाटील यांसह शेतकऱ्यांनी जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

जुन्नर ते आपटाळे मार्गावर पाडळी ग्रामपंचायत हद्दीत पंचलिंग देवस्थान ट्रस्टसह बुट्टे पाटील व अन्य शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे जवळपास ६० एकराहून अधिक माळरान क्षेत्र आहे. बहुतांशी स्थानिक पशुपालक म्हैस, गाई, शेळ्या यांसारखी शेकडो जनावरे चारण्यासाठी पावसाळ्यानंतर या गायरानाचा वापर करतात. या माळरानाच्या नजीक असलेल्या सोमतवाडी ग्रामपंचायत हद्दीत तसेच परिसरात छोट्या मोठ्या हॉटेलांची व अन्य दुकानांची संख्या वाढली आहे. हॉटेलसह अन्य दुकानांमधील कचरा, प्लास्टिक, बाटल्या या माळरानावर बेजबाबदारपणे फेकून दिल्या जात असल्याने या जनावरांच्या आरोग्याला बाधा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तसेच या कचऱ्याच्या सम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने येथील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकारांना आळा बसवून बेजबाबदारपणे कचरा माळरानावर टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकरी नितीन कबाडी यांसह पशुपालकांनी मागणी केली आहे.
------------------

केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना निधीदेखील दिला आहे. या प्रश्नाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील. - हेमंत गरिबे, सहायक गटविकास अधिकारी, जुन्नर तालुका पंचायत समिती
------------------------

संबंधित व्यावसायिकांना यापूर्व काळातच घनकचरा न टाकण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. पशुपालकांच्या तक्रारींवर तत्काळ दोन दिवसांत ग्रामसभा आयोजित करून हा प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच माळरानावर घनकचरा फेकणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - अश्विनी नेहरकर, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सोमतवाडी
-------------------------