आईचा सन्मान (या उपक्रमासाठीचा लेख) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईचा सन्मान (या उपक्रमासाठीचा लेख)
आईचा सन्मान (या उपक्रमासाठीचा लेख)

आईचा सन्मान (या उपक्रमासाठीचा लेख)

sakal_logo
By

कर्तृत्वाने झाली सर्वांची ‘धुमाळ मावशी’

आमची आईने भंगार मालाचा व्यवसाय पाच हजार रुपयांवर सुरु केला. कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात कठोर परिश्रम घेत आज करोडो रुपयांची ती उलाढाल करत आहे. विठोबाच्या भक्तीने, श्रद्धेने तीने मोठे विश्व निर्माण केले. कर्तृत्वावर साऱ्या समाजात ती ‘धुमाळ मावशी’ म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

- संगीता रणपिसे (कुदळवाडी), लता वाळुंज (चाकण), दिलीप धुमाळ (गवारवाडी-माण)

आमच्या आईचा जन्म सन १९५२ मध्ये चिखली-टाळगाव (ता. हवेली) येथे झाला. आईचे मूळ नाव बाळूबाई आहे. तिचे वडील विष्णू यादव व आई शांताबाई यांना पाच मुले, त्यात आईचा चौथा क्रमांक. तीन वर्षाची असताना ती आईला पारखी झाली. वडील आळंदी व पंढरीची वारी करणारे वारकरी होते. पाचही भावंडे एकमेकांच्या सहकार्याने मोठी होऊ लागली. वयाच्या सतराव्या वर्षी सन १९६९ मध्ये आमच्या आईचा विवाह सुदाम धुमाळ यांच्याशी झाला. माण (ता. मुळशी) येथील गवारवाडीत संसारात ती नांदू लागली. पंचवीस माणसांचे एकत्रित कुटुंब होतं. शेतीशिवाय दुसरे उत्पन्न नव्हते. हलाखीच्या जीवनात तीने संगीता व लता या दोन मुली व मुलगा दिलीप, या आम्हा तीन भावडांचा अतिशय कष्टाने सांभाळ केला.
एकत्र कुटुंबात आईला कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नव्हते. मात्र, काही तरी करण्याची ऊर्जा तिला गप्प बसू देत नव्हती. अखेर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी पती व आम्हा मुलांबाळासह ती गवारवाडीच्या शेतातील घरात राहू लागली. तिचे धाकटे भाऊ अन् आमचे मामा बाळासाहेब यादव यांच्या प्रोत्साहनाने तिने भंगार मालाचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तो काळ सन १९८८ चा होता. त्यावेळी पुणे शहर व जिल्ह्यात भंगार मालाचा व्यवसाय करणारी तुरळक मंडळी होती. आईचे शिक्षण फक्त इयत्ता दुसरी झालेले. अंगावर साधी नऊ वारी साडी, कपाळी मोठे कुंकू, पायात साधी चप्पल होती. मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरातील कंपन्यमध्ये भंगार जमा करण्यासाठी ती जात असे. अनेक कंपन्यांच्या गेटवर तास न् तास ताटकळत बसत होती. ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता ती अनेक कंपन्यांमध्ये फिरत होती. अनेक कंपन्यांमध्ये सुरवातीस त्रास सहन करावा लागत होता. सुरवातीला दोन किलो, पाच किलो, असे मिळेल ते भंगार डोक्यावर घेऊन येत होती. कधी एसटीत पिशवी भरून घेऊन ती गवारवाडीत येत असे. पहिले पाच वर्षे आईला खूप कष्ट पडले. मात्र, गोड व प्रेमळ स्वभावाने तीने कंपनी मालकांचे मन जिंकले. पिरंगुट येथील इंटोशॅाटले कंपनीचे मालक श्री. पुसाळकर साहेबांनी आईला कंपनीचे सर्व भंगार देण्यास सुरवात केली. त्यावेळेपासून तीचा व्यवसाय वाढू लागला. मोठे गोदाम बांधले. त्यानंतर अनेक कंपन्यांचे आईला मोठे सहकार्य मिळाले. आज दोनशे कामगारांना ती मुलांबाळासारखे सांभाळते.
आईने जसे आम्हा मुलांवर प्रेम केले, तसे साऱ्या समाजावर केले. आई जवळ आलेला कोणीही व्यक्ती निराश होऊन गेला नाही. आई अनेकांना मदत करते. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते. कोणी संकटात असला, तर त्याला धिराचा आधार देते. आईची विठ्ठल भक्ती मोठी आहे. आजोबांचा वारकरी संप्रदाय आजही ती जपत आहे. तीने एकटीने जिद्दीने व विठोबाच्या भक्तीने लाखो रुपये खर्च करून विठोबा-रखुमाईचे मंदिर गवारवाडीत बांधले. त्यामध्ये दत्त, श्रीकृष्ण व महादेवाचे स्वतंत्र मंदिरे आहेत. त्यामुळे शेकडो नागरिक येथे नेहमी दर्शनासाठी येतात. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सात दिवसांचा कीर्तन सप्ताह आयोजित करते. मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तने व भजने मंदिरात होत असतात.
वय सत्तर असले, तरी आईचे कष्ट थांबले नाहीत. आजही ती नियमित कष्ट करते. तिची शिस्त, व्यवहारातील चोखपणा, वेळेचे महत्त्व, एकमेकांचा आदर, मृदू आवाजात गोड व प्रेमळ बोलण्याने साऱ्या समाजात ती ‘धुमाळ मावशी’ म्हणून ओळखली जाते. कर्तृत्वामुळे व कार्यामुळे ती आजच्या समाजातील एक संत आहे, असे आम्हा सर्व मुलांना वाटते.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00797 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top