मुळशीतील शेतकऱ्यांना आंब्याची गोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील शेतकऱ्यांना आंब्याची गोडी
मुळशीतील शेतकऱ्यांना आंब्याची गोडी

मुळशीतील शेतकऱ्यांना आंब्याची गोडी

sakal_logo
By

मुळशी तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड वाढत आहे. केशर व हापूस जातीचे प्रमाण त्यामध्ये जास्त आहे.

राजेंद्र मारणे, भुकूम

मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. मात्र, भात व उसाचे उत्पादन परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शक्य असलेल्या भात खाचरात आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. तसेच, पडीक माळरान, खाचरांच्या बांधांवर आंब्याची लागवड केली आहे. यापूर्वी खाचराच्या बांधावर चार-दोन रायवळ, हापूस, पायरी जातीची झाडे असायची. शेतकरी त्यांच्याकडे उत्पन्नाचा भाग म्हणून पाहत नव्हते. काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेलावडे, खेचरे, मांदेडे परिसरात तत्कालीन सभापती स्व. अप्पासाहेब ढमाले यांनी हापूस आंब्याचा खुंटी कलमाचा प्रयोग केला. तो चांगला यशस्वी झाला. त्यावेळेपासून तालुक्यातील शेतकरी आंब्याकडे उत्पन्न म्हणून पाहू लागले.

केशरची लागवड वाढली
मुळशी तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून केशर आंब्याची लागवड वाढली आहे. हापूस आंबा उशिरा येतो. दरवर्षी फळे लागतातच, असे नाही. कलमांच्या वाढीला अनेक वर्षे लागतात. त्यामुळे शेतकरी केशर आंब्याच्या लागवडीकडे वळले आहेत. केशर आंब्याचे रोप लवकर वाढते. फळे तिसऱ्या वर्षापासून मिळतात व दरवर्षी येतात. चवीलाही चांगला आहे. हापूस इतकी केशरलाही मागणी व भाव मिळतो.

सधन लागवडीस प्राधान्य
आंबा लागवड पूर्वी वीस बाय वीस फुटावर करत असे. त्यामुळे एकरी कमी चाळीस रोपे बसत असे. सधन पद्धतीच्या लागवडीत पाच फुटावरही लागवड केली जाते. पाच बाय बारा अशा अंतरावर एकरी पाचशे झाडे बसू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.

पिकाच्या क्षेत्रात वाढ
मुळशी तालुक्यात सध्या दोनशे पस्तीस हेक्टरवर आंब्याची लागवड झाली आहे. कृषी खात्याच्या रोजगार हमी योजनेतून गेल्या दोन वर्षात नव्वद हेक्टरवर शेतकरींनी आंबा लागवड केली आहे. दापोली कृषी विद्यापीठ, तेथील खासगी नर्सरी येथून शेतकरी रोपे आणत असतात. तसेच, मुळशी तालुका शेतकरी संघाकडून पाच हजार रोपांचे नाममात्र किमतीत रोपांचे वाटप केले. तसेच, आंबा लागवडीच्या माहितीसाठी शेतकरी मेळावा, शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. तालुक्यात बारमाही पाणी सर्वत्र असल्यामुळे शेतकऱ्यांनी झाडांना ठिबक सिंचन योजना राबविल्या आहेत.

बाजारपेठही जवळ
मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मार्केट जवळ आहे. तसेच, तालुक्यातील पिरंगुट, हिंजवडी, सूस बावधन गावांचे शहरीकरण झाले. तेथे शेतकरी ते ग्राहक, अशी विक्री करण्यास मोठी संधी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा मिळतो. तसेच, अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा बागा, फळे जागेवरच खरेदी करतात. तालुक्यातील हवामान व जमिनी आंबा उत्पादनास योग्य आहेत. त्यामुळे भविष्यात मुळशीचा हापूस, केशर बाजारात ओळखला जाईल, अशी परिस्थिती आहे.

मुळशीतील आंबा दृष्टीक्षेपात
- आंब्याचे क्षेत्र 235 हेक्टर
- उत्पन्नात हापूसपेक्षा केशरला प्राधान्य
- कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेतला
- बाजारपेठ जवळ असल्याचा फायदा