
मुळशीत लग्न सराईमुळे वाहतूक कोंडी भर
भुकूम, ता. १९ ः मुळशी तालुक्याच्या पूर्व भागात लग्न सराईमुळे दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री, खासदार, आमदार यांची लग्नांना उपस्थिती असते. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडते.
तालुक्यात सध्या लग्न सराईचा हंगाम मोठा सुरू आहे. तालुक्यातील भूगाव, बावधन, भुकूम, सूस, घोटावडे, पिरंगुट परिसरात अनेक लग्न कार्यालये आहेत. सध्या कडक उन्हाळा आहे. तसेच दिवसभराचे काम उरकून मोठा समाज लग्नाला यावा यासाठी वधूवर पिता मुहूर्ताची वेळ संध्याकाळची ठेवतात. तालुक्यातील पुढारी यांना एकाचवेळी अनेक लग्नांची निमंत्रणे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी भेटी देत जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील लग्नाच्या वेळी ते उपस्थित राहतात. रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांच्या भेटी सुरू असतात. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, इच्छुक उमेदवार यांची आवर्जून उपस्थिती असते. संध्याकाळची लग्न असल्यामुळे समाजही मोठ्या प्रमाणावर जमतो. त्यामुळे तालुक्यात सध्या भूगाव, चांदणी चौक, हिंजवडी ते बावधन महामार्ग, घोटावडे हनुमान चौक, सूस, घोटावडेफाटा येथे सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत असते. अनेकवेळा दोन ते चार तास कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.