
मुळशी तालुक्यात आंबा उतरणी सुरू
भुकूम, ता. २७ : मुळशी तालुक्यातील पहिला मोहोर आलेल्या आंब्याच्या झाडावरील फळ उतरणी सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोहोर आला होता पण बदलत्या हवामान, अवकाळी यामुळे उत्पादन कमी झाले आहे.
तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात हापूस, केशर, पायरीचा झाडांना मोहोर आला होता. त्यावेळी थंडी पडली नाही. तसेच डिसेंबर अखेर पाऊस, दुखे, ढगाळ हवामान यामुळे मोहोर व फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे अशा झाडांना कमी फळे लागली. तसेच त्यानंतर गारांचा पाऊस झाला त्यामुळे आलेल्या फळांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी दरवर्षी येणारा मोहोर फारच कमी आला. त्यासाठी आवश्यक अशी थंडी योग्य वेळेत पडली नाही.
कोकण व कर्नाटकातील हापूस, केशर आंब्याची शेवटच्या टप्प्यातील आवक अद्याप सुरू आहे. त्यामुळे मुळशीतील आंब्यांना कमी भाव मिळत आहे. शेतकरी कच्ची फळे पाठविण्याचे पसंत करतात. त्यांना तीस ते पन्नास रुपये किलोस भाव मिळत आहे, असे कोळावडे येथील शेतकरी रायबा उभे यांनी सांगितले. दरम्यान, जून महिन्यात मुळशीतील खरा आंबा हंगाम सुरू होईल.
01655