
भिगवण शिक्षण मंडळाला अभ्यासक्रमाची मान्यता
भिगवण, ता. २७ : भिगवण (ता. इंदापूर) येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी. कॉम व वृत्तपत्रविद्या व जनसंवाद पदविका या दोन अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी दिली.
विद्यापीठाने संस्थेचा अर्ज व या परिसराची गरज विचारात घेऊन या दोन्ही अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून मान्यता दिली आहे. याबाबत केंद्राचे संयोजन प्रा. तुषार क्षीरसागर म्हणाले, या भागातील विद्यार्थी व पालकांची मागणी विचारात घेऊन संस्थेने हे दोन दूरस्थ अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. त्यास परवानगी मिळाल्यामुळे हे अभ्यासक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.