कंत्राटी कामगार पाच महिने पगाराविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगार पाच महिने पगाराविना
कंत्राटी कामगार पाच महिने पगाराविना

कंत्राटी कामगार पाच महिने पगाराविना

sakal_logo
By

भिगवण, ता. ३१ ः येथील ग्रामीण रुग्णालयातील १४ कामगारांना मागील पाच महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका बाजूला शासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार महिना पूर्ण होण्यापूर्वीच अदा केला असताना दुसऱ्या बाजूला कंत्राटी कामगारांचा मागील पाच महिन्यांपासून पगारच झालेला नाहीत. तातडीने पगार करा अन्यथा २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करू, अशा इशारा कामगारांनी दिला आहे.


याबाबत कंत्राटी कामगारांनी थकीत पगार तातडीने द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये परिचारिका, लॅब, एक्सरे टेक्निशियन, शिपाई आदी पदांवर १४ कामगार कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले आहेत. नेमणूक करत असताना या कामगारांना नियमित वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु मागील पाच महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना वेतन दिले गेले नसल्यामुळे या कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. ऐन दिवाळीच्या सणानिमित्त तरी पगार मिळेल, अशी आशा कंत्राटी कामगारांना होती, मात्र दिवाळीमध्ये कामगारांना पगार दिला न गेल्यामुळे कामगारांची दिवाळीही अंधारात गेली आहे.
पाच महिने पगार न मिळाल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष पसरला असून, थकीत पगार व दिवाळी बोनस तातडीने द्या अन्यथा २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करू, असा इशारा कामगारांनी दिला आहे. दरम्यान, रुग्णाची सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा पगार तातडीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
------------------------------
भिगवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचा पगार मागील काही महिन्यांपासून रखडला आहे. याबाबत कामगार व कंत्राटदार यांची बैठक बोलावून याविषयी तोडगा काढण्याच्या सूचना सबंधितास दिल्या आहेत. कंत्राटी कामगारांचा पगार तातडीने व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. - डॉ. अनिकेत लोखंडे, अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय