भिगवणमध्ये सात जणांविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवणमध्ये सात जणांविरुद्ध
सावकारकीचा गुन्हा दाखल
भिगवणमध्ये सात जणांविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल

भिगवणमध्ये सात जणांविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

भिगवण, ता. ६ ः पिंपळे (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याकडून दोन लाख रुपयांच्या मुद्दलापोटी सात लाख वसूल करणाऱ्या व सुरक्षेसाठी दिलेली जमीन परत मागितली असता शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.

या प्रकरणी बापूराव नभाजी कुलाळ, संगीता बापूराव कुलाळ (रा. दोघे तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा), बाबू गेणू वाघमोडे (रा, मलठण, ता. दौंड), कुंडलिक जर्नाधन भिसे (रा. पिंपळे, ता. इंदापूर) व इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबादास दत्तू भिसे (वय. ४५, रा. पिंपळे, ता. इंदापूर) या शेतकऱ्याने भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादीचा आर्थिक अडचणीचा फायदा घेत २ लाख रुपये ५ टक्के व्याजाने दिले होते. सुरक्षेसाठी फिर्यादीच्या मालकीची मौजे पिंपळे (ता. इंदापूर) येथील गट नं. २८ येथील ४० आर. क्षेत्राचे खरेदीखत करुन घेतले होते. फिर्यादीने आरोपींना व्याज व मुद्दल असे एकूण ६ लाख ९५ हजार रुपये वेळोवेळी दिले असतानाही फिर्यादीची जमीन फिर्यादीस परत न करता आरोपींनी फिर्यादीकडे आणखी ४० लाख रुपयांची मागणी करीत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम करीत आहे.