
निसर्ग व धार्मिक पर्यटनाची इंदापूर तालुक्यात मोठी संधी
निसर्ग व धार्मिक पर्यटनाची
इंदापूर तालुक्यात मोठी संधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका परिसर हा निसर्ग, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाचा समृद्ध अनुभव देण्यासाठी पर्यटकांना खुणावतो आहे. उजनी धरणावर येणारे शेकडो प्रकारचे देशी-विदेशी पक्षी निसर्ग पर्यटनाचा अनुभव देतात; तर नीरा नरसिंहपूर येथील नृसिंह मंदिर, पळसदेव येथील पळसनाथ मंदिर, धाकटे पंढरपूर म्हणून सर्वपरिचित असलेले विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर, बाबीर देवस्थान व लुमेवाडी येथील दर्गा धार्मिक पर्यटनाची भूक भागवितात; तर ऐतिहासिक इंदापूर शहर ऐतिहासिक पर्यटनाचा अनुभव देते. एकूणच निसर्ग, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाचा सुरेख संगम इंदापूर तालुक्यामध्ये पहावसाय मिळतो.
- प्रा. डॉ. प्रशांत चवरे, भिगवण
एका बाजूला नीरा; तर दुसऱ्या बाजूला भीमा नदी असल्यामुळे इंदापूर तालुक्यावर निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. तालुक्यात विस्तार असणारे ११७ टी.एम.सी. साठवण क्षमता असलेले उजनी धरण पुणे, सोलापुर व नगर या तीन जिल्ह्यांची तहान भागविण्याबरोबरच व्यवसाय व उद्योगाच्या नानाविध संधी येथील स्थानिक भूमिपुत्रांना उपलब्ध करून देत आहे. उजनी धरण परिसर हा राज्यातील पर्यटकांचा विशेषतः पक्षीप्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या धरणामध्ये पाणी अडविण्यास सुरवात झाल्यापासून नौकानयन करण्यासाठी आणि धरणावर येणारे विविध पक्षी पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक भेट देत असतात.
उजनी धरणावर येणारे फ्लेमिंगो, चित्रबलाक, युरोपियन भोरड्या, राखी बगळे, बदक, सीगल आदी शेकडो प्रकारचे पक्षी पर्यटकांना भुरळ घालतात. धरणावरील सूर्योदय, सूर्यास्त व विविध प्रकारचे पक्षी पाहण्याबरोबरच येथील प्रसिद्ध भिगवणची मच्छी खवैय्यांचीही हौस पूर्ण करते. भिगवणची मच्छी खाण्यासाठी राज्यभरातील खवय्ये भिगवण व परिसराला भेट देतात. सध्या पुणे जिल्ह्यातील हिवाळी पर्यटनासाठी उजनी काठ हा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे येताना दिसतो आहे.
उजनी काठावर डिसेंबरमध्ये येणारे परदेशी फ्लेमिंगो (रोहित) पक्षी हे राज्यासह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ, तक्रारवाडी, डाळज परिसरामध्ये फ्लेमिंगोचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन तलाव व चित्रबलाक पक्ष्याचे परिसरातील सर्वांत मोठे सारंगगार आहे. येथे चित्रबलाक पक्ष्यांबरोबरच युरोपीय भोरड्यांच्या कवायती अंगावर अक्षरशः शहारे आणतात. हजारोंच्या संख्येने असलेल्या भोरड्या डोळ्यांचे पारणे फेडतात. या भागांमध्ये कृषी पर्यटनाच्या अनेक संधी दिसून येतात. कृषी पर्यटनाची अनेक केंद्र येथे उभारण्यात आली आहे. हुरडा पार्टीसाठी लोक इंदापूरला प्राधान्य देतात. एकूणच हिवाळी पर्यटनासाठी एक उत्तम पॅकेज येथे उपलब्ध आहे.
ऐतिहासिक वारसा
इंदापूर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तालुक्यातील अनेक पुरातन व ऐतिहासिक स्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यामुळे इंदापूर ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इंदापूर, सुपे, बारामती पुरंदर परगण्याचा उल्लेखही इतिहासामध्ये आढळतो. इंदापूर शहरातील इंद्रेश्वर मंदिर, रामवेस अशा अनेक ऐतिहासिक वास्तु शहरामध्ये आहेत. ऐतिहासिक महत्वाबरोबच इंदापूर तालुक्याचे धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक स्थानांमध्ये इंदापूर तालुक्यातील व पुणे व सोलापुर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा-नरसिंहपूरचे विशेष महत्त्व आहे. या स्थळाचा अभंगांमध्ये दक्षिण प्रयाग असाही उल्लेख आहे. लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या दर्शनासाठी भाविक येथे येतात. नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदी व भीमा नदी यांचा संगम आहे. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन, असे हे रमणीय स्थान आहे. येथे महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशासह देशभरातील भाविक भेट देतात. नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर प्रचंड असा घाट, पेशवेकालीन वास्तुशिलाचा एक उत्तम नमुना असलेले मंदिर, रंगशिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधकाम असून, दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत.
धार्मिक स्थळांचेही आकर्षण
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पळसनाथ मंदिर हे अभ्यासकांच्या मते सुमारे १००० वर्षांपूर्वीचे आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सन १९७८च्या सुमारास हे मंदिर पाण्यामध्ये गेले. अनेक वर्षे पाण्यामध्ये असूनही मंदिर अजूनही सुस्थितीत आहे. हे मंदिर तत्कालीन स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना आहे. या स्थानास स्थापत्य व धार्मिक असे महत्त्व आहे. उजनी धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर या मंदिरास भेट देण्यासाठी राज्यासह देशातील पर्यटक आवर्जून भेट देतात. त्याच बरोबर पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडी हे स्थळ धाकटे पंढरपूर म्हणून परिचित आहे. येथे विठ्ठलभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान हे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान आहे. येथील बाबीर यात्रेसाठी राज्यासह परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात. या स्थानाबरोबच लुमेवाडी येथील हाजी हाफीज फतेह मोहमंद जोधपुरी बाबांचा दर्गाह ही धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान आहे. येथे राज्यासह राजस्थान, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील भाविक दरवर्षी उरसाच्या निमित्ताने दर्शनासाठी येतात.
पर्यटनातून व्यावसायिक संधी
इंदापूर तालुक्यामध्ये असलेल्या धार्मिक व निसर्ग पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध होत आहे. हिवाळी पर्यटनासाठी उजनी काठ; तर वर्षभरासाठी येथील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये पर्यटन वाढताना दिसत आहे. या भागांमध्ये हॉटेल व्यवसायातून मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भिगवणची मच्छी हा एक नवा ब्रॅण्ड महाराष्ट्रामध्ये रुजत आहे. त्यानिमित्ताने ज्या प्रमाणे लोक समुद्रातील मासे खाण्यासाठी कोकणात जातात, अगदी त्याच प्रमाणे गोड्या पाण्यातील मासे खाण्यासाठी खवय्ये भिगवण व इंदापूर तालुक्याला प्राधान्य देतात. हॉटेल व्यवसायाबरोबरच वाहन व्यवसाय, बोटींग तसेच पूरक व्यवसायही युवकांना रोजगाराच्या नानाविध संधी उपलब्ध करून देत आहेत.