
प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा व्हावा ः पवार
भिगवण, ता. १० ः एकविसाव्या शतकामध्ये महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. समाजाचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिला सक्षम झाल्या तरच समाज सक्षम होईल. केवळ महिला दिनी महिलांचा सन्मान किंवा आदरातिथ्य करून चालणार नाही तर प्रत्येक दिवस हा घराघरांमध्ये महिला दिन म्हणून साजरा झाला पाहिजे, असे मत बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. महेश देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हा खजिनदार सचिन बोगावत, विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अॅड. नीलिमा गुजर, अशोक प्रभुणे, स्वामी चिंचोलीच्या सरपंच पुनम मदने, भिगवणच्या माजी सरपंच हेमाताई माडगे, प्राचार्य सरिता शिंदे आदी उपस्थित होते. सुनेत्रा पवार म्हणाल्या, आदरणीय शरद पवार साहेब यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागाप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आहे. त्याच्या भूमिकेला अनुसरून दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे नव्याने शैक्षणिक संकुल उभारण्यात येत आहे. सध्या येथे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा देणार आहोत तर गरजेनुसार या शैक्षणिक संकुलाचा विस्तार करण्यात येईल.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. येथील खाऊ गल्लीस भेट देऊन सुनेत्रा पवार यांनी महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे नियोजन विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
फ्लेमिंगो मॅरेथॉन स्पर्धा
विद्या प्रतिष्ठानच्या येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने फ्लेमिंगो मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महिला, पुरुष व मुले अशी तीन टप्प्यामध्ये घेण्यात आली. स्पर्धेमध्ये सुमारे १२०० स्पर्धेकांनी सहभाग घेतला. पुरुष गटांमध्ये प्रदीप भोई, चेतन राठोड, महिलांच्या गटांमध्ये तनिष्का पाटील व रचना बाडंगे तर मुलांच्या गटांमध्ये बालाजी अडवाल व स्वप्नील गलांडे विजेते ठरले. विजेत्यांना राष्ट्रीय खेळाडू मनोज डोंबाळे, तुषार निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, बिल्टचे बाळासाहेब सोनवणे, नागेंद्र भट, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे श्रीश कंबोज उपस्थित होते.