
भिगवण परिसरात फळबागांनाही फटका
भिगवण, ता. १८ : इंदापूर तालुक्यातील भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ आदी गावांमध्ये शनिवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा, द्राक्ष आदी फळबागांनाही या पावसाचा फटका बसला.
भिगवण व परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु, शनिवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण व परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तसेच, रस्त्यावरूनही पाणी वहात होते.
या पावसामुळे सध्या काढणीस आलेल्या खरीपाच्या ज्वारी, गहु, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भिगवण व परिसरामध्ये द्राक्ष, आंबा आदींच्या फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. पावसामुळे फळबागांचेही नुकसान होणार असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. खरीपाच्या पिकांचा हातातोंडाशी आलेल्या घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.