
भोरमधील शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता
भोर, ता. ५ : तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरलेल्या भातरोपांची वाढ झाली नाही, तर काही ठिकाणी पेरलेली काही रोपे अद्याप उगवली नाहीत. परिणामी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भोर तालुक्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होतो आणि जूनमहिनाअखेरपर्यंत भाताची रोपे तयार होतात. त्यानंतर जुलैपासून भातलावणी सुरु होते. मात्र, यावर्षी पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. जून महिन्यात हलक्या स्वरूपाचा तुरळक पाऊस झाला. त्यानंतर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोशी खोरे, आंबवडे खोरे, वेळवंड खोरे आणि भुतोंडे खोरे या भागातील भाताच्या रोपांची पेरणी झाली. पुणे-सातारा महामार्ग आणि पूर्वेकडील भागात भाताच्या रोपांची पेरणी ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात झाली. त्यामुळे या भागातील रोपांची अद्याप वाढ झालेली नाही. सध्या तालुक्यात पावसाच्या तुरळक सरी येत आहेत. मात्र, भातरोपांच्या वाढीसाठी हवा तास पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागलेली आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या २५ टक्केच पाऊस झाला आहे. भोर तालुक्यात खरीप हंगामाच्या पिकांचे एकूण २० हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून, भाताचे क्षेत्र ७ हजार ६५० हेक्टर आहे. भातरोपांच्या पेरण्या ७५० हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झालेल्या आहेत. मात्र, पाऊस झाला तरच त्याची वाढ होऊन पुनर्लागवड केली जाईल. भातपिकाच्या खालोखाल १ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. १५० हेक्टर क्षेत्रावर चाचणीच्या पिकाच्या, तर ५९९ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे. याशिवाय सर्व खरिपातील ज्वारी, बाजरी, वरई, मका, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळे, ऊस, चारापिके व भाजीपाला पिकांच्या पेरण्याही पूर्ण झाल्या आहेत.
तालुक्यात आतापर्यंत फक्त तीन-चार दिवसच जोराचा पाऊस झालेला आहे. तालुक्यातील भोलावडे महसूल मंडलात (महुडे व वेळवंड खोऱ्यात) सर्वाधिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल नसरापूर मंडलात २५ टक्के, तर भोर मंडलात सर्वात कमी ९ टक्के पाऊस झाला आहे.
सद्यःस्थितीत तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भातरोपांची वाढ होण्यासाठी पावसाची गरज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम पट्यातील भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यास सुरवात होईल. पाऊस न आल्यास भाताच्या रोपांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
- देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, भोर
Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00317 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..