सुप्रिया सुळे यांना दाखविले काळे झेंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळे यांना दाखविले काळे झेंडे
सुप्रिया सुळे यांना दाखविले काळे झेंडे

सुप्रिया सुळे यांना दाखविले काळे झेंडे

sakal_logo
By

भोर, ता. १८ : महुडे खुर्द (ता. भोर) येथील नीरा-देवघर धरणाच्या डाव्या बंदिस्त कालव्याच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमास आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याच्या कारणावरून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नांद (ता. भोर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांना काळे झेंडे दाखविले.

महुडे खुर्द येथे मंगळवारी (ता. १८) दुपारी नीरा-देवघर धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी खासदार सुळे या आल्या होत्या. नांद येथे रस्त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष नितीन दामगुडे, अमर शेडगे आदी प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. त्यानंतर खासदार सुळे यांनी थांबून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीकडून प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदारास घेऊनच सर्व कार्यक्रम केले जात असल्याचे सांगत सुळे यांनी या कार्यक्रमासही आमदार थोपटे यांना सोमवारी (ता. १८) कळविण्यात आले असल्याचे सांगितले. आज महुडे येथील नियोजित केलेले कालव्याच्या जागेची पाहणी आणि शेतकरी मेळावा घेणार आहे. नीरा देवघर डाव्या कालव्याच्या भूमिपूजनाचा पुढील कार्यक्रम आमदार थोपटे यांना बरोबर घेऊन केला जाईल, असे आश्वासन सुळे यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते शांत झाले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या आंदोलनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी ५ अधिकारी व ३५ पोलिस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.