पर्यटकांची पावले भोरच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांची पावले भोरच्या दिशेने
पर्यटकांची पावले भोरच्या दिशेने

पर्यटकांची पावले भोरच्या दिशेने

sakal_logo
By

पर्यटकांची पावले भोरच्या दिशेने

भोर तालुक्यात गड-किल्ले, धरणे, हिरवेगार डोंगर, खळखळणाऱ्या नद्या, मंदिरे, मन प्रसन्न करणारे अल्हाददायी वातावरण, सोयी-सुविधांयुक्त पर्यटनस्थळे आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय चांगला परिसर आहे. त्यामुळे तालुक्यात हजारो हौशी पर्यटक आणि गिरीप्रेमी येत आहेत. पुण्या-मुंबईतील अनेक जण शनिवारी-रविवारी कुटुंबासह फिरण्यासाठी भोरची निवड करत आहेत.

- विजय जाधव, भोर

भोर तालुक्यातील पर्यटनस्थळांवर दर शनिवारी-रविवारी पर्यटकांची गर्दी होत असते. तालुक्यात फिरण्याबरोबर देशी गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे तालुक्यातील हॉटेल व धाब्यांवर खाऊप्रेमींची गर्दी असते. परंतु, सद्यःस्थितीत केवळ फिरणे आणि खाणेपिण्याबरोबर आपल्या मुलाबाळांना ग्रामीण भागाची जाणीव व्हावी, यासाठी शहरातील नागरिक भोरमधील कृषी पर्यटनस्थळे शोधू लागली आहेत. त्यामुळे भोर तालुक्यात कृषी पर्यटन व्यवसायास सुरवात झाली आहे. भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरण क्षेत्र, वेळवंड खोरे, आंबवडे खोरे, भुतोंडे खोरे आणि हिर्डोशी खोरे या परिसरात अनेक व्यावसायिकांनी जमिनी खरेदी करून कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहेत. याशिवाय तालुक्यातील पुण्याहून काही मिनिटांच्या अंतरावरील पुणे-सातारा मार्गावरील गावांमध्येही कृषी पर्यटन केंद्रे सुरु झाली आहेत. तालुक्यातील हिर्डोशी व वेळवंड खोऱ्यातील काही भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी इतरांना न विकता स्वतःच हॉटेल सुरु केली आहेत.

ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन
तालुक्यातील कृषी पर्यटनामध्ये ग्रामीण भागातील जीवनशैली दाखविली जात आहे. बैलगाडीतून सफर, आडातून शेंदून पाणी भरणे, सुगीच्या दिवसात गहू, हरभरा, तूर, मूग व ज्वारीच्या शेतातून सफर आदींचे आयोजन केले जाते. खाण्यासाठी गावरान मिरचीचा खरडा, चूलीवरील भाकरी आणि मटण, पिठलं भाकरी, गव्हाच्या भाजलेल्या ओंब्या, हरभऱ्याचा हावळा, ज्वारीचा व बाजरीचा हुरडा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दिले जातात. यासोबत स्वीमिंग टॅंक, रेन डान्स आणि मुलांसाठी खेळणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जात आहेत. एका दिवसाच्या सहलीशिवाय राहण्याची सोयदेखील केली जात आहे. यासाठी ग्रामीण भागाचा लुक असलेली छोटी रो हाउसही बनविली आहेत. तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणाच्या बॅक वॉटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रे आहेत. धरणांच्या बॅक वॉटरचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या भागातील कृषी पर्यटनाची निवड करतात.

पीकअप- ड्रॉपची सुविधा
भोरच्या परिसरात १५पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे आहेत. बहुतेक सर्वच कृषी पर्यटनांचे बुकिंग हे ऑनलाइन होत आहे. पुण्याहून पिकअप आणि ड्रॉपची सुविधाही माफक दरात केली जात आहे. याशिवाय तालुक्यातील इतर पर्यटनस्थळेही दाखविली जात आहेत. त्यामुळे भोरच्या परिसरास पर्यटकांची पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एका दिवसासाठी म्हणजे सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ८०० ते १५०० रुपये चार्ज आकारला जातो. आणि रहिवासासहीत अडीच-तीन हजार रुपयांपर्यंत चार्ज घेतला जात आहे.

पर्यटकांना कोणतीही शुल्क नाही
भोर परिसराचे वातावरण हे महाबळेश्वरशी मिळते-जुळते असून, तालुक्यातील एकाही पर्यटनस्थळावर, गड-किल्ल्यावर आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांना कसलेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. भोर तालुक्यात नसरापूर येथील श्रीक्षेत्र बनेश्वर, इंगवली येथील नेकलेस पॉइंट, भाटघर व नीरा देवघर धरण, भोर शहरातील राजवाडा, शनिघाट, भोरेश्वर मंदिर व वाघजाई मंदिर, मांढरदेवच्या श्री काळूबाई देवीला जाणारा अंबाडखींड घाट, वरंधा घाट, आंबवडे येथील नागनाथाचे मंदिर व झुलता पूल, रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ला आदी ठिकाणी पर्यटकांना कोणतेही शुल्क आकारली जात नाही. त्यामुळे पर्यटक आनंदी आहेत. तालुक्यात अद्यापही कोणत्याही ग्रामपंचायतीने प्रवेश शुल्क, स्वच्छता शुल्क, पाणी कर व इतर कोणत्याही प्रकारचा कर पर्यटकांना लावलेला नाही. त्यामुळे शनिवारी व रविवारी तालुक्यातील रस्ते पर्यटकांनी फुललेले असतात.