वरंधा घाटात सेल्फी काढताना 
शिक्षकाचा दरीत कोसळून मृत्यू

वरंधा घाटात सेल्फी काढताना शिक्षकाचा दरीत कोसळून मृत्यू

भोर, ता. ४ : वरंधा घाटाच्या दरीत कोसळून शिक्षकाचा मृत्यू झाला. अब्दुल कुदबुद्दीन शेख (वय ४०, रा. नसरापूर, ता. भोर, मूळ रा. एरंडी, ता. कोरंगळा, जि. लातूर), असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (ता. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. माकडासोबत सेल्फी काढण्याच्या नादात, हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत भोर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्षक अब्दुल शेख हे मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर, त्यांच्या पत्नी या करंजावणे (ता. वेल्हे) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते नसरापूर येथे राहात होते. शनिवारी ते नसरापूरला आले होते. मंगळवारी दुपारी ते मोटारीतून (क्र. एमएच ०३ बीई ७४१५) पुन्हा मंडनगडला निघाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते वरंधा घाटातील वाघजाई मंदिरासमोर नेहमीप्रमाणे थांबले. घाटातील माकडांना खाऊ देऊन ते त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते सुमारे ५०० फूट दरीत कोसळले असावेत, अशी शक्यता आहे. मात्र, याची कोणालाही खबर लागली नाही. बराच वेळ त्यांची मोटार उभी असल्यामुळे ते दरीत पडले असावेत, हे लक्षात आले. मात्र, दरीत डोकावून पाहिल्यानंतर काही पडल्याचे दिसले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीम, महाडमधील साईकॅप सोल अॅडव्हेंचर आणि पोलादपूर येथील साळुंके रेस्क्यू टीमचे सदस्यही रात्री घटनास्थळी दाखल झाले. भोरचे पोलिस हवालदार उद्धव गायकवाड व विकास लगस यांनी रेस्क्यू टीमसोबत धोका पत्करून दरीत शोध घेतला. सहा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना दरीत शेख यांचा मृतदेह आढळून आला. पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांची ओळख पटली आणि त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com