
भोर शहरामध्ये आज रंगणार कुस्तीचा आखाडा
भोर, ता. ४ ः येथील ग्रामदैवत वाघजाईदेवीच्या यात्रा महोत्सवात तब्बल ५५ वर्षांनंतर रविवारी (ता. ५) कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे. पैलवान प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने तीन दिवसांच्या श्री वाघजाई यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पूर्वी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कुस्त्या भरविल्या जात असत. परंतु, काही कारणांमुळे ५५ वर्षांपासून महोत्सवातील कुस्त्या बंद झाल्या. भोरमधील काही ग्रामस्थांनी यावर्षीपासून पुन्हा कुस्त्यांचा आखाडा सुरु करून कुस्त्यांची परंपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे. शहरातील वाघजाईनगर परिसरातील वाघजाई देवीच्या मंदिराशेजारी आखाड्याचे काम करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी चार वाजत कुस्त्यांना सुरुवात होणार आहे. भोर नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसवेक यशवंत डाळ यांच्या वतीने कुस्तीतील पहिल्या क्रमांकाचे अडीच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरे २ लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांच्याकडून, नितीन थोपटे यांच्याकडून दीड लाख रुपयांचे तिसरे बक्षीस, पुण्याच्या माजी नगरसेविका माधुरी मिसाळ यांच्याकडून एक लाख रुपयांचे चौथे बक्षीस, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मांडके यांच्याकडून ७५ हजार रुपयांचे पाचवे बक्षीस तर जिल्हा बँकेचे माजी संचालक भालचंद्र जगताप यांच्याकडून ५० हजार रुपयांचे सहावे बक्षीस देण्यात येणार आहेत. याशिवाय इतरही कित्येक लाखांच्या बक्षीसांचा समावेश आहे.