भोरमध्ये लाचखोरीच्या प्रकरणांत वाढ

भोरमध्ये लाचखोरीच्या प्रकरणांत वाढ

भोर, ता. १७ ः तालुक्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून लाच घेताना तीन अधिकाऱ्यांसह एकूण चार जण आढळून आले आहेत. यामध्ये शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे व्यवस्थापक, पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आदींचा समावेश आहे.
राज्य सरकारमधील फेरबदलामुळे गेल्या वर्षभरापासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आणि सर्व कारभार प्रशासकांकडे आला. पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार आणि नागरिकांमध्ये कोणताही समन्वय राहिला नाही. याशिवाय प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. त्यामुळे नियमित व पगाराच्या दृष्टीने असलेले कामकाज वगळता काही कामे कासवाच्या गतीने सुरु आहेत. तर काही कामे ठप्प झाली आहेत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरांवरील कामे मोठ्या प्रमाणात आहेत.
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांमुळे नागरिक, ठेकेदार व प्रशासनांमधील तक्रारींचे त्वरित निवारण केले जात होते. परंतु, सद्यःस्थितीत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचेही बंधन राहिले नाही. सर्व स्तरांवरील प्रशाासकांकडे अनेक ठिकाणाच्या कामाचा कार्यभार असल्यामुळे त्यांना संबंधित ग्रामपंचायतींना हव्या त्या प्रमाणात वेळ देता येत नाही. यापूर्वी तालुक्यात होत असलेल्या विकासकामांवर पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते. निवडणुका वेळेत न झाल्याने पदाधिकाऱ्यांचे विकासकामांवरील लक्ष कमी झाले. त्यामुळे ठेकेदार करीत असलेल्या कामांचा दर्जा वेळेवर तपासला जात नाही. ठेकेदार व अधिकारी-कर्मचारी यांच्यामधील संपर्क कमी झाला. त्यामुळे पैसे घेण्या-देण्याच्या प्रकारात वाढ झाली आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रारी सुरु झाल्या. याचाच परिणाम म्हणजे चारजण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. लाचलुचपत विभागाच्या कारवायांमुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामे पूर्ण करण्यास वेळ लागत आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांमार्फत नागरिकांच्या तक्रारी व अडचणी त्वरित प्रशासनाकडे येत होत्या. परंतु, प्रशासक असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि अभिप्राय आमच्यापर्यंत पोचण्यास वेळ लागत आहे. पर्यायाने कामे संथ गतीने होत आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय पंचायत समितीकडे त्वरित दिल्यास आम्हाला पुढील कार्यवाही करणे सोपे जाईल
-किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com