भोर येथे थोपटे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर येथे थोपटे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
भोर येथे थोपटे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

भोर येथे थोपटे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

sakal_logo
By

भोर, ता. २१ : येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयातील अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता.२१) महाविद्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या आदेशानुसार महाविद्यालयातील २६ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनात तृतीय श्रेणीतील ७ आणि चतुर्थ श्रेणीतील १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला. ५८ महिन्यांची थकबाकी द्यावी, सहावा वेतन आयोग लागू करावा आणि ठराविक वर्षापर्यंत कार्यरत राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती मिळावी या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांच्यासह राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने कार्यकारी अधिकारी तात्याराव जेटीथोर, श्रीधर निगडे व एस. ए. उल्हाळकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास संस्थेच्या वतीने पाठिंबा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यस्तरीय संघटनेकडून आदेश आल्यानंतरच आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरू करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी महाविद्यालयातील विनाअनुदानित कर्मचायांच्याकडून बारावी आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे कामकाज करून घेण्यात आले असल्याचेही प्राचार्य देशमुख यांनी स्पष्ट केले.

01348