
भोरचा सामाजिक योजना कक्ष ‘तहसील’च्या तळमजल्यावर
भोर, ता. २७ : भोर येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कक्ष म्हणजेच सामाजिक योजना कक्ष हा मंगळवारपासून (ता. २८) कार्यालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सुरु होणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
भोरचे तहसील कार्यालय हे संस्थान काळापासून राजवाडी चौकातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. त्याच मजल्यावर संजय गांधी योजनेचेही कार्यालय आहे. तळमजल्यावर नागरिक सुविधा केंद्र, संगणक कक्ष व दुय्यम निबंधक कार्यालय आहे. नागरिकांची जास्त संपर्क येणारे विभाग म्हणजेच योजना कक्ष व पुरवठा शाखा आहेत. त्यामुळे बदलत्या काळासोबत जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क येणाऱ्या या दोन्हीही शाखांपैकी पुरवठा शाखा ही यापूर्वी तळमजल्यावर आणण्यात आलेली आहे. परंतु, उर्वरित संजय गांधी योजना कक्ष म्हणजेच सामाजिक योजना कक्ष हा विभाग अद्याप इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच कार्यान्वित होता. दिव्यांग व अपंग नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी दिव्यांगांनी व नागरिकांनी योजना कक्ष तळमजल्यावर असावा, अशी विनंती तहसीलदारांकडे केली होती. त्यास प्रतिसाद देत मंगळवारपासून तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सांगितले.